Mamata Banerjee Meet PM Modi : थकीत निधीबाबत पंतप्रधान मोदी यांनी दिले ममता बॅनर्जींना आश्वासन | पुढारी

Mamata Banerjee Meet PM Modi : थकीत निधीबाबत पंतप्रधान मोदी यांनी दिले ममता बॅनर्जींना आश्वासन

पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज (दि.२०) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेल्या राज्याच्या निधीचा प्रश्न निकालात काढण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. पश्चिम बंगालला केंद्रीय निधी रोखल्याच्या आरोपावरून वादंग उठले होते. या पार्श्वभूमीवर ही बॅनर्जी यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. (Mamata Banerjee Meet PM Modi)

दरम्यान, पंतप्रधानांशी भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री बॅनर्जी म्हणाल्या की, आमच्या पक्षाच्या खासदारांसह दहा सदस्यीय शिष्टमंडळाने आज पंतप्रधानांची भेट घेतली. मी पंतप्रधानांना राज्याचा प्रलंबित निधी तत्काळ देण्याची विनंती केली आहे. (Mamata Banerjee Meet PM Modi)

आम्हाला 2022-23 च्या अर्थसंकल्पात (मनरेगा अंतर्गत) 100 दिवसांच्या कामासाठी एक पैसाही मिळाला नाही. प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी थांबवण्यात आला आहे, ग्रामीण विकास योजना बंद करण्यात आल्या आहेत. आरोग्य अभियान कार्यक्रम बंद करण्यात आले आहे. आम्हाला वित्त आयोगांतर्गत निधीही मिळालेला नाही, असे बॅनर्जी यांनी सांगितले.

यावर पंतप्रधानांनी केंद्र आणि राज्याच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली जाईल, असे सांगितले आहे. आम्ही 155 वेळा केंद्र सरकारला स्पष्टीकरण दिले आहे. गरीब लोकांच्या कल्याणकारी योजनांचे पैसे थांबवणे योग्य नाही. केंद्राकडे पश्चिम बंगालचे 1.15 लाख कोटी रुपये येणे बाकी आहे, असे बॅनजी यांनी सांगितले.

दरम्यान, पक्षाचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केल्याच्या प्रकरणावर बॅनर्जी म्हणाल्या की, मिमिक्रीच्या वादावर, आमचा संसदीय पक्ष यावर उत्तर देऊ शकतो. ते निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत. तर मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पाठिंबा जाहीर केला आहे.

हेही वाचा 

Back to top button