Pune News : पिझ्झा, कपड्यांवरचा खर्च टाळा, पुस्तके घ्या : डॉ. कुमार विश्वास | पुढारी

Pune News : पिझ्झा, कपड्यांवरचा खर्च टाळा, पुस्तके घ्या : डॉ. कुमार विश्वास

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुस्तकांमुळे वाचकांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो. मात्र वेब सीरिज व चित्रपटांतून प्रेक्षकांच्या कल्पना दृश्यांतून बंदिस्त केल्या जातात. पुस्तकांचे वाचन हा स्वसंवादाचा उत्तम मार्ग आहे. त्यामुळे पिझ्झा, कपडे अशा गोष्टींवरील खर्च कमी करा, पण पुस्तके विकत घेऊन वाचा, असे आवाहन हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास यांनी केले. पुस्तकांमुळे आत्म्याची इम्युनिटी वाढते. वाचलेले मनात राहते आणि कधी ना कधी कामी येते, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवात ’कवी की कल्पना से’ या विषयावर डॉ. कुमार विश्वास यांनी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे संचालक युवराज मलिक, महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे प्रायोजक कृष्णकुमार गोयल, भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रसेनजित फडणवीस हे या वेळी उपस्थित होते.

डॉ. कुमार विश्वास म्हणाले, की चुकीच्या गोष्टींवर भाष्य करणे हे कवीचे काम आहे. चौथीत असताना मला लोकमान्य टिळकांचे ‘गीतारहस्य’ पारितोषिक म्हणून मिळाले होते. विनोबा भावे, ओशो अशा अनेकांनी गीतेवर उत्तम लेखन केले आहे. मात्र कर्मयोगाच्या संदर्भात टिळकांचे ’गीतारहस्य’ सर्वोत्तम आहे. व्याख्यानानंतर विश्वास यांनी ‘कोई दिवाना कहता है’ ही त्यांची प्रसिद्ध रचना सादर केली. त्यांचे व्याख्यान आणि सादरीकरणाला उपस्थितांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

इथे पुस्तके विकत घेऊन वाचली जातात..

तावडे म्हणाले, महाराष्ट्रात पुस्तके विकत घेऊन वाचली जातात, हे साहित्य संमेलनातील पुस्तकांच्या खपांच्या आकड्यांतून कळते. त्यामुळे हा पुणे पुस्तक महोत्सव वाचकांसाठी पर्वणी आहे. गेल्या तीन दिवसांत तीन विश्वविक्रम पुणे पुस्तक महोत्सवात नोंदवले गेले आहेत. पुस्तकांची दोनशेपेक्षा जास्त दालने या महोत्सवात असल्याचे राजेश पांडे यांनी सांगितले.

हेही वाचा

 

Back to top button