India vs South Africa : नवा गडी… नवे राज्य | पुढारी

India vs South Africa : नवा गडी... नवे राज्य

जोहान्सबर्ग, वृत्तसंस्था : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात झालेला पराभव मागे टाकत भारतीय संघ आता या प्रकारात नव्याने सुरुवात करीत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (India vs South Africa) आज (रविवारी) त्यांचा पहिला एकदिवसीय सामना रंगणार आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत अनेक नवे चेहरे आपली प्रतिभा दाखवण्यासाठी सज्ज आहेत. या सामन्यातून रिंकू सिंग याचे पदार्पण निश्चित आहे, पण त्याचबरोबर भारतासाठी नवीन सलामीवीर या मालिकेतून मिळणार असून ऋतुराज गायकवाड सोबत साई सुदर्शन याला संधी मिळू शकते.

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी गेल्या दीड दशकात मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे; परंतु त्यांचे करिअर आता उतरणीला लागले आहे. त्यामुळे त्यांचा वारसा चालवण्याची जबाबदारी आता युवा पिढीवर आली आहे. विशेषत: कर्णधार म्हणून के. एल. राहुलची ही चाचणी परीक्षा असेल. तो यात यशस्वी झाला तर 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत त्याला जबाबदारी देण्यात येऊ शकते.

भारताच्या दक्षिण आफ्रिका दौर्‍याची सुरुवात टी-20 मालिकेने झाली. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियाने टी-20 मालिका खेळली. मात्र, आता लोकेश राहुलच्या नेतृत्वात भारत तीन सामन्यांची वन डे मालिका खेळत आहे. पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला लोकेश राहुलने पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर भाष्य केले. त्याने सांगितले की, संजू सॅमसन वन डेमध्ये मधल्या फळीत अर्थात पाच किंवा सहा नंबरला खेळेल. रिंकू सिंगला आगामी मालिकेत संधी दिली जाईल. मी स्वत: एक यष्टिरक्षक फलंदाज म्हणून प्रतिनिधित्व करेन. चौथ्या क्रमांकावर मला खेळण्यास संघ व्यवस्थापनाने हिरवा सिग्नल दिला आहे.

चहरची माघार, आकाशदिपची निवड (India vs South Africa)

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा पायाच्या दुखापतीमुळे कसोटी मालिकेला मुकला आहे. तर दिपक चहर याने वनडे मालिकेतून माघार घेतली आहे. त्याच्या वडीलांना ब्रेनस्ट्रोक आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या जागी आकाशदिपची निवड करण्यात आली आहे.

Back to top button