ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण द्या : विजय वडेट्टीवार | पुढारी

ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण द्या : विजय वडेट्टीवार

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे. मराठा, ओबीसी समाजातील युवकांच्या भावना सरकारने समजून घ्याव्यात. एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होणारा गावगाड्यातील माणूस गुण्या-गोविंदाने राहावा, अशी ठाम भूमिका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत मांडली. त्याचबरोबर विदर्भातील एका मंत्र्याने राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांचा अपमान केला म्हणून त्यांनी राजीनामा दिला असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.

विधानसभेत 293 अन्वये मराठा, धनगर आरक्षणाच्या मांडलेल्या प्रस्तावासंदर्भात ते बोलत होते. वडेट्टीवार म्हणाले, सरकारने समाजात सलोखा निर्माण केला पाहिजे, असे सांगून मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर लाठीचार्ज कोणाच्या आदेशाने झाला, जिल्हा पोलिसप्रमुख यांच्यावर कोणतीही कारवाई का केली नाही, असा सवाल त्यांनी यावेळी केला.

राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांचा विदर्भातील मंत्र्याने अपमान केला. या अध्यक्षांना, सदस्यांना राजीनामा द्यायची वेळ कोणामुळे आली, अशा पद्धतीने वागणूक दिली जात असेल तर ते योग्य नाही, असे त्यांनी सरकारला सुनावले.
मराठा समाजाला आरक्षण देऊ, ओबीसी हक्काचे संरक्षण करू, अशी आपली भूमिका असली पाहिजे. ओबीसी आमचा डीएनए असे म्हणणार्‍यांना ओबीसीसाठी वेळ मिळत नाही, असा हल्लाबोल वडेट्टीवार यांनी केला.

कोणाचे कमी न करता मराठा आरक्षण द्या : सुनील प्रभू

या राज्यातील कोणत्याही समाजाच्या ताटातील, त्यांच्या वाट्यातील आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण द्या. तर आणि तरच या मराठा समजाला दिलेल्या आरक्षणचा संपूर्ण महाराष्ट्रात फायदा होईल, अशी मागणी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी विधानसभेत मांडलीप्रभू म्हणाले, आरक्षणावरून सध्या महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण झाली आहे.

भुजबळांच्या सभेला 7 कोटी कुठून आले : सुरेश धस

मराठा आरक्षणावर विधान परिषदेत गुरूवारी सलग दुसर्‍या दिवशी चर्चा झाली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथील सभा 21 लाखांत झाली; पण जालना येथील भुजबळांच्या सभेला 7 कोटी रुपये कुठून आले याचे उत्तर द्यावे, असा सवाल भाजपचे आमदार सुरेश धस यांनी या चर्चेदरम्यान केला. तसेच, बीड येथील हल्ल्याचा कोणी मास्टर माईंड नव्हता. हल्ल्यामध्ये केवळ ओबीसी नेत्यांची कार्यालये नाही तर मराठा असलेल्या भाजप, दोन्ही शिवसेना आणि बीआरएसच्या नेत्यांचेही कार्यालयांना तरुणांनी लक्ष केल्याचेही धस म्हणाले.

Back to top button