Rajesh Kshirsagar : राजेश क्षीरसागर यांच्याकडून दोघांना मारहाण | पुढारी

Rajesh Kshirsagar : राजेश क्षीरसागर यांच्याकडून दोघांना मारहाण

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : सामूहिक टेरेसवर रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पार्टीला विरोध केल्याने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, माजी आमदार राजेश क्षीरसागर आणि त्यांचे पुत्र ऋतुराज क्षीरसागर यांनी राजेंद्र वरपे आणि शौर्य वरपे या बाप-लेकास शुक्रवारी रात्री मारहाण केली. या प्रकारानंतर वरपे यांच्या मुलीने क्षीरसागर यांच्यावर कारवाई झाली नाही तर इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या करू, असा इशारा देणारा व्हिडीओ व्हायरल केला. या सर्व प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. (Rajesh Kshirsagar)

क्षीरसागर पिता-पुत्राकडून झालेल्या मारहाणीच्या सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडीओ गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र व्हायरल होत आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार देऊनही गुन्हा नोंद केला जात नाही, लक्ष्मीपुरी पोलिस पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप राजेंद्र वरपे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. गुन्हा दाखल केला नाही तर पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करू, असा इशाराही त्यांनी दिला. (Rajesh Kshirsagar)

बेदम मारहाण; हात-पाय तोडण्याची धमकी

वरपे म्हणाले, शनिवार पेठेतील शिवगंगा संकुलात सहाव्या मजल्यावर माझा फ्लॅट आहे. या इमारतीच्या टेरेसवर शुक्रवारी रात्री दीड वाजेपर्यंत पार्टी सुरू होती. याबाबतची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना दिली. पोलिसांना माहिती दिल्याने क्षीरसागर पिता-पुत्रासह काही कार्यकर्त्यांनी आपल्याला व मुलगा शौर्य याला बेदम मारहाण केली.

क्षीरसागर यांच्याकडील शस्त्रे ताब्यात घ्या

क्षीरसागर यांच्या दहशतीमुळे आमच्या कुटुंबाला धोका निर्माण झाला आहे. खबरदारी म्हणून क्षीरसागर यांच्याकडील घातक शस्त्रे पोलिसांनी तातडीने ताब्यात घ्यावी, अशीही मागणी वरपे यांच्या पत्नी शुभांगी व मुलगी सिद्धी यांनी यावेळी केली.

फ्लॅट बळकावण्यासाठी क्षीरसागर यांच्याकडून दहशत

शिवगंगा संकुलातील आपला फ्लॅट बळकाविण्याच्या उद्देशानेच क्षीरसागर दहशतीचा अवलंब करत आहेत, असा आरोप वरपे यांनी केला. एका कार्यकर्त्याकरवी आपल्यावर सावकारकीचा गुन्हा दाखल केल्याचा आरोपही वरपे यांनी केला.

कार्यकर्ते वरपे कुटुंबाला सरंक्षण देणार : इंगवले

क्षीरसागर पिता-पुत्राने सत्तेचा गैरवापर करून गोरगरिबांवर अन्याय सुरू केला आहे. वरपे कुटुंबावर झालेला हल्ला भ्याड आहे. कुटुंबाच्या संरक्षणासाठी शिवसेनेचे शंभरावर कार्यकर्ते त्याच्या फ्लॅटसमोर थांबून त्यांना संरक्षण देणार असल्याचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले म्हणाले.

चौकशीत दोषी ठरल्यास कारवाई : महेंद्र पंडित

वरपे यांना झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना एकनाथ शिंदे गट व शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची स्वतंत्र भेट घेऊन परस्परविरोधी निवेदन सादर केले. यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना पंडित म्हणाले. दोन्ही गटांकडून निवेदन प्राप्त झाली आहेत. घडलेल्या घटनेबाबत सखोल चौकशी करण्यात येईल. चौकशीअंती दोषीवरील कारवाईबाबत निर्णय घेण्यात येईल.

Back to top button