Mahua Moitra | महुआ मोईत्रा यांची खासदारकी धोक्यात, लोकसभेतून हकालपट्टीची समितीची शिफारस
पुढारी ऑनलाईन : कॅश फॉर क्वेरी प्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्याबाबत नैतिक आचरण समितीने आज शुक्रवारी (दि.८) लोकसभेत अहवाल सादर केला. नैतिक आचरण समितीने अहवालातून TMC च्या खासदार महुआ मोईत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्याची आणि केंद्र सरकारकडून वेळेत चौकशी करण्याची शिफारस केली आहे.
संबंधित बातम्या
- Mahua Moitra : महुआ मोईत्रा यांच्याविरोधात एथिक्स कमिटीचा अहवाल सादर; लोकसभेत विरोधकांचा गदारोळ
- महुआ मोईत्रा यांच्यावरील अपात्र कारवाईनंतर अधीर रंजन चौधरी यांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र
- Mahua Moitra : महुआ मोईत्रांना प्रश्नांच्या बदल्यात मौल्यवान भेटवस्तू दिल्या : दर्शन हिरानंदानी
महुआ मोइत्रांनी केलेल्या गंभीर गैरवर्तनाबद्दल कठोर शिक्षेची गरज आहे. त्यामुळे समितीने शिफारस केली आहे की खासदार महुआ मोईत्रा यांची सतराव्या लोकसभेच्या सदस्यत्वावरून हकालपट्टी केली जाऊ शकते. महुआ मोईत्रांच्या अत्यंत आक्षेपार्ह, अनैतिक, गंभीर आणि गुन्हेगारी वर्तनाच्या पार्श्वभूमीवर समितीने केंद्र सरकारला कालबद्ध पद्धतीने सखोल, कायदेशीर, संस्थात्मक चौकशी करण्याची शिफारसही केली आहे.
कॅश फॉर क्वेरी प्रकरणात नैतिक आचरण समितीचा अहवाल आज लोकसभेत सादर होताच विरोधकांनी त्याला जोरदार विरोध केला. यामुळे लोकसभेत गदारोळ झाल्याने कामकाज काहीवेळ तहकूब करण्यात आले.
लोकसभा अध्यक्षांकडून कठोर कारवाईचे संकेत
महुआ मोईत्रा प्रकरणावरील लोकसभेच्या नैतिक आचरण समितीच्या ४९५ पानांच्या अहवालाचा अभ्यास करण्यासाठी किमान ४ दिवस देण्यात यावे, असे काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले आहे. तर काही कठोर निर्णय घ्यायचे असतील तर ते सभागृहाची प्रतिष्ठा राखण्यासाठी घ्यावे लागतील, असे स्पष्ट संकेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिले आहेत. दरम्यान, विरोधी सदस्यांचे म्हणणे आहे की त्यांना महुआ मोईत्रा विरुद्धच्या ‘कॅश फॉर क्वेरी’ तक्रारीवरील आचार समितीच्या अहवालाच्या प्रती मिळालेल्या नाहीत.
महुआ मोईत्रा यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ नये अशी मागणी संसदीय समित्यांच्या नियमांचा हवाला देत काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी याआधी केली होती. यानंतर, तृणमूल काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनीही या कारवाईला विरोध व्यक्त केला आहे.
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी संसदेत प्रश्न विचारण्यासाठी उद्योगपती दर्शन हिरानंदानींकडून पैसे व भेटवस्तू घेतल्याच्या आरोपांची चौकशी भाजप खासदार विनोद सोनकर यांच्या अध्यक्षतेखालील नैतिक आचरण समितीने केली. या प्रकरणात समितीने महुआ मोईत्रांची लोकसभा सदस्यपदावरुन हकालपट्टी करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून महुआ मोईत्रा यांनी पैसे तसेच भेट वस्तू घेऊन संसदेत प्रश्न विचारले असल्याची तक्रार भाजप नेते निशिकांत दुबे यांनी लोकसभाध्यक्षांकडे केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी समूहावर प्रश्न विचारण्यासाठी खासदार मोइत्रा यांनी लाच घेतल्याचे त्यात म्हटले होते. महुआ मोईत्रा यांचे पूर्वाश्रमीचे निकटवर्तीय जय अनंत देहादराय यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे निशिकांत दुबे यांनी ही तक्रार केली होती. त्यात, व्यावसायिक लाभासाठी विचारलेल्या प्रश्नांसाठी महुआ मोईत्रा त्यांचा लोकसभेचा लॉगीन आयडी आणि पासवर्ड हिरानंदानी यांच्याकडे देण्यात आल्याचा उल्लेख होता.
विशेष म्हणजे हिरानंदानी यांनीही त्याबाबत कबुली दिली होती. संसदेच्या सुरक्षेशी निगडीत हे प्रकरण लोकसभाध्यक्षांनी लोकसभेच्या नैतिक आचरण समितीकडे चौकशीसाठी सोपविले होते. समितीने चौकशी पूर्ण करून अहवाल आणि आपल्या शिफारशी लोकसभाध्यक्षांकडे सुपूर्द केल्या आहेत. अर्थात, महुआ मोईत्रा यांना व्यक्तिगत स्वरुपाचे प्रश्न विचारल्याच्या आरोप प्रत्यारोपांवरून समितीची चौकशीही वादळी ठरली होती.
Ethics Committee report recommends the expulsion of TMC MP Mahua Moitra from Lok Sabha and investigation by the Government of India in time bound manner.
The report reads – (i) The serious misdemeanours on the part of Mahua Moitra calls for severe punishment. The Committee,…
— ANI (@ANI) December 8, 2023