Mahua Moitra : महुआ मोईत्रा यांच्याविरोधात एथिक्स कमिटीचा अहवाल सादर; लोकसभेत विरोधकांचा गदारोळ | पुढारी

Mahua Moitra : महुआ मोईत्रा यांच्याविरोधात एथिक्स कमिटीचा अहवाल सादर; लोकसभेत विरोधकांचा गदारोळ

पुढारी ऑनलाईन डेस्क : पैसे घेऊन प्रश्न विचारल्याप्रकरणी टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात एथिक्स कमिटीचा (नैतिक समिती) अहवाल आज (दि.८) दुपारी १२ वाजता लोकसभेत सादर करण्यात आला. भाजप खासदार आणि आचार समितीचे अध्यक्ष विनोद सोनकर यांनी अहवाल सादर केला. दरम्यान, विरोधकांनी गोंधळ घालून घोषणाबाजी केल्याने संसदेचे कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. Mahua Moitra

अहवाल सादर केल्यानंतर महुआ मोइत्रा यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा प्रस्ताव सरकारकडून येऊ शकतो. या अहवालात लाच घेऊन प्रश्न विचारणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या खासदाराची सभागृहातून हकालपट्टी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. ९ नोव्हेंबररोजी झालेल्या बैठकीत महुआ मोइत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्याची शिफारस करणारा अहवाल समितीने स्वीकारला होता. Mahua Moitra

महुआ २ नोव्हेंबरला एथिक्स कमिटीसमोर हजर झाल्या होत्या. आचार समितीवर नाराज होऊन त्या सभा सोडून निघून गेल्या होत्या. त्यांनी पॅनेल सदस्यांवर अश्लील प्रश्न विचारल्याचा आरोप केला. समितीच्या विरोधी सदस्यांनी महुआला पाठिंबा दिला. समिती अध्यक्षांनी महुआ यांच्यावर असंसदीय शब्द वापरल्याचा आरोपही केला आहे.

लोकसभेत महुआ मोइत्रा यांच्यावरील आचार समितीचा अहवाल सादर होताच विरोधी सदस्यांनी गोंधळ घातला. त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत महिलांचा अपमान करणे बंद करा, असे सांगितले. टीएमसीचे खासदार मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देत वेलमध्ये पोहोचले, त्यानंतर सभागृहाचे कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब करत असल्याचे लोकसभेतील पीठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button