माेठी बातमी : उधमपूर हल्ल्याचा मास्टरमाईंड हंजालाचा पाकिस्‍तानमध्‍ये खात्‍मा | पुढारी

माेठी बातमी : उधमपूर हल्ल्याचा मास्टरमाईंड हंजालाचा पाकिस्‍तानमध्‍ये खात्‍मा

पुढारी ऑनलाइंन डेस्‍क : जम्‍मू-काश्‍मीरच्‍या उधमपूरमध्‍ये सीमा सुरक्षा दलाच्‍या (बीएसएफ) ताफ्‍यावर हल्‍ल्‍याचा सूत्रधार आणि लष्‍कर-ए-तोयबाच दहशतवादी हंजला अदनान याची कराचीत हत्‍या करण्‍यात आली आहे, असे वृत्त ‘इंडिया टूडे’ने दिले आहे. (Udhampur attack) कराचीमध्‍ये अज्ञात हल्‍लेखोरांनी त्‍याची गोळ्या झाडून हत्‍या केली. या घटनेने पाकिस्‍तानमध्‍ये खळबळ माजली आहे.

काही दिवसांपूर्वी हंजला याने रावळपिंडीतून कराचीमध्‍ये आश्रय घेतला होता. हंजाल अदनान हा 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि लष्‍कर-ए-तोयबाचा म्‍होरक्‍या हाफिज सईदच्या निकटवर्ती होता. हंजला अदनान याला २ किंवा ३ डिसेंबरच्‍या मध्यरात्री त्याच्या घराबाहेर गोळ्या घालण्यात आल्या. तो गंभीर जखमी झाला. पाकिस्तानी लष्कराने गुप्तपणे कराची येथील रुग्णालयात नेले, येथे 5 डिसेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला, असेही या वृत्तात नमूद करण्‍यात आले आहे.

२०१५ मध्‍ये उधमपूर येथे सीमा सुरक्षा दलाच्‍या ताफ्यावर हल्ला झाला होता. या भ्‍याड हल्‍ल्‍याचा सूत्रधार हंजाल होता. या हल्‍ल्‍यात सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले होते. तर १३ कर्मचारी जखमी झाले होते. या प्रकरणी राष्‍ट्रीय तपास संस्‍थेने ( एनआयए)आरोपपत्र दाखल केले होते. यानंतर २०१६ मध्‍ये जम्मू आणि काश्मीरच्या पंपोर भागात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्‍या ( सीआरपीएफ ) ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातही हंजाल याचा सहभाग होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे आठ जवान शहीद झाले होते तर २२ जवान जखमी झाले होते.

Back to top button