करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह यांची गोळ्या झाडून हत्या, राजस्‍थानमध्ये खळबळ | पुढारी

करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह यांची गोळ्या झाडून हत्या, राजस्‍थानमध्ये खळबळ

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे ( Karni Sena )अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी (Sukhdev Singh ) यांची आज (दि.५ ) दुपारी हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केल्‍याचे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे. या घटनेने राजस्‍थानमध्‍ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी शहरात शोधमोहीम सुरू केली आहे. ( Karni Sena President Sukhdev Singh ) दरम्‍यान, कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीचा (Lawrence Bishnoi gang )  सदस्य रोहित गोदारा कपुरीसर याने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.

एक हल्‍लेखोर ठार, दोघे पसार

या घटनेबाबत माहिती देताना जयपूरचे पोलीस आयुक्त बिजू जॉर्ज जोसेफ यांनी सांगितले की, जयपूरमधील शामनगर परिसरात सुखदेव सिंह यांचे घर आहे.आज दुपारी १.४५ च्या सुमारास  भेटण्यासाठी तीन लोक आले होते. सुरक्षेची परवानगी मिळाल्यानंतर तिघेही आत गेले. त्यांच्यात दहा मिनिटे चर्चा झाली. यानंतर या तिघांनी सुखदेव यांच्यावर गोळीबार केला. रुग्णालयात उपचारादरम्यान सुखदेव यांचा मृत्यू झाला. हल्ल्याच्या वेळी सुखदेव यांच्‍याजवळ उभ्या असलेल्या सुरक्षा रक्षकालाही गोळी लागली. त्‍याच्‍यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. यावेळी सुखदेव यांच्‍या सुरक्षा रक्षकांनी केलेल्‍या गोळीबारात एका हल्लेखोराचाही मृत्यू झाला आहे. नवीन सिंह शेखावत असे त्यांचे नाव आहे. दोन्ही हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. ठिकठिकाणी बॅरिकेडिंग करून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. ( Karni Sena President Sukhdev Singh )

सीसीटीव्ही फुटेजमध्ये हल्‍लेखाेर कैद

सुखदेव सिंह यांच्‍या गाेळीबार करणारे तिन्‍ही हल्‍लेखाेर सीसीटीव्‍हीत कैद झाले आहेत. एक हल्‍लेखाेर सुखदेव यांच्‍या सुरक्षा रक्षकांनी केलेल्‍या गाेळीबारात ठार झाला. दोन हल्लेखोर पसार झाले. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माध्यमातून आरोपींपर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे.

हॉस्पिटलबाहेर समर्थकांची गर्दी, पोलिसांनी जमावाला रोखले

सुखदेव सिंह यांच्‍यावर झालेल्‍या गोळीबाराच्या घटनेची माहिती सोशल मीडियाच्‍या माध्‍यामून सर्वत्र झाली. त्‍यांच्‍या नातेवाईकांसह समर्थकांनी रुग्णालयात धाव घेतली. मात्र त्यांना रुग्‍णालया बाहेर रोखण्‍यात आल्‍याने काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला. तेथेही मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्‍यात आला आहे. सोशल मीडियावरून सुखदेव सिंह यांच्‍या हत्‍येचे वृत्त मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्‍याने राजस्‍थानमध्‍ये खळबळ उडाली आहे.

चित्रपट दिग्दर्शक भन्साळी यांच्‍या कानशिलात मारल्‍याने चर्चेत

आनंदपाल एन्काउंटर प्रकरणानंतर गोगामेडी पहिल्यांदा प्रकाशझोतात आले. त्यावेळी आनंदपाल यांच्या मृतदेहाबाबत अनेक दिवस निदर्शने करण्यात आली. त्यानंतर गोगामेडी यांचे नाव खूप चर्चेत आले.पद्मावती चित्रपटाच्या चित्रकरणाच्‍यादरम्यान सुखदेव सिंह गोगामेडी यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना त्यांच्या सेटवर कानशिलात मारली होती. सुखदेव सिंह गोगामेडी यांनी पद्मावती चित्रपटाच्या विरोधात सतत मोर्चेबांधणी सुरू केली आणि देशभरात त्याचा निषेध केला, परिणामी चित्रपट निर्मात्याला चित्रपटाचे नाव बदलून पद्मावत ठेवावे लागले होते. तसेच या चित्रपटातील अनेक दृश्ये काढून टाकली. यानंतर सुखदेव सिंह हे राजपूत समाजातील तरुणांमध्ये खूप लोकप्रिय झाले. त्‍यांनी 2018 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून भद्रामधून तिकीट मागितले होते. मात्र त्‍यांना उमेदवारी मिळाली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून सुखदेव सिंगचे लॉरेन्स बिश्नोई टोळीच्‍या संघर्षाची चर्चा होती.

हेही वाचा : 

Back to top button