सकारात्मक बातमी ! ममताचा पहिला नातू एचआयव्ही मुक्त | पुढारी

सकारात्मक बातमी ! ममताचा पहिला नातू एचआयव्ही मुक्त

रवी कोपनर

कात्रज : गुजर-निंबाळकरवाडी येथील ममता फाउंडेशन संस्थेत निराधार व जन्मजात एड्स हे गंभीर आजार नशिबी आलेल्या मुलांचा सांभाळ केला जात आहे. ममता परिवारातील चार मुलींची लग्नदेखील झाली असून, त्या सुखाने संसार करीत आहेत. आनंदची बाब म्हणजे ‘ममता’चा पहिला नातू हा एचआयव्ही मुक्त जन्मला आहे. आता एचआयव्ही पॉझिटीव्ह आईपासून होणारे मूल हे एचआयव्ही मुक्त होण्यात यश मिळाले आहे.
ममता फाउंडेशन या एड्सग्रस्त मुलांचा सांभाळ करणार्‍या संस्थेची स्थापना 2007 साली डॉ. अमर बुडूख व डॉ. शिल्पा बुडूख या दाम्पत्यांनी केली. या संस्थेत सध्या 36 एड्सग्रस्त मुले-मुली वास्तव्यास आहेत. स्वतःची कोणतीही चूक नसताना एचआयव्ही एड्ससारख्या आजाराला बळी पडलेल्या मुलांना आधार, प्रेम, वैद्यकीय देखभाल कारण्याचे काम फाउंडेशनकडून गेल्या 14 वर्षांपासून सुरू आहे.
सुरुवातीला या कार्यात अनेक अडचणी आल्या. मात्र, त्यांना तोंड देऊन या मुलांना समाजात ताठ मानेने जगता येईल असे त्यांना घडवले आहे. ममता परिवारातील मुले व मुली आज वेगवेगळ्या पदावर नोकरी करत आहेत.  शेल पेट्रोलियम कंपनीमध्ये कोणी सुपरवायझर आहे, तर कोणी टेक्निशियन आहे. अनिकेत हा एका कंपनीत काम करत असून, तो कायम झाला आहे. आकाशने स्वतःच्या कमाईतून चारचाकी घेतली असून, तो टूर बिझनेस करत आहे. दोन मुली फॅशन डिझाईनचा कोर्स करून या क्षेत्रात त्या कार्यरत आहेत.

समाजासाठी ही मुले आदर्श

ममता परिवारातील सर्व मुले शिक्षण घेत असून, सर्व सण-उत्सव आनंदात साजरे करतात. आपल्या आजाराचा बाऊ न करता त्याच्यावर मात करून समाजात या मुलांनी एक आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण करून त्यांना स्वावलंबी बनविण्याचे कार्य ही संस्था करीत आहे. फाउंडेशनकडून निराधार मुलांना आधार; दुर्धर आजारावर मात करीत स्वालंबनाचे धडे
ममता फाउंडेशनमध्ये मुलांची अतिशय उत्तमप्रकारे काळजी घेतली जाते. त्यांना मिळणारा सकस व पौष्टिक आहार, वैद्यकीय सेवा, कौटुंबिक वातावरण, आई-वडिलांप्रमाणे प्रेम या सर्व गोष्टींमुळे मुलांचे आरोग्य उत्तम आहे. सरकारकडून मिळणार्‍या एआरटी औषधांमुळे ही मुले अगदी सामान्य जीवन जगत आहेत.
-डॉ. शिल्पा बुडूख,  संस्थापक, ममता फाउंडेशन.
हेही वाचा

Back to top button