भारत-दक्षिण कोरियातील परस्पर संबंध अधिक वृद्धिंगत व्हावेत : चांग जे. बोक | पुढारी

भारत-दक्षिण कोरियातील परस्पर संबंध अधिक वृद्धिंगत व्हावेत : चांग जे. बोक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील परस्पर मैत्रीपूर्ण संबंधांना 50 वर्षे पूर्ण होत आहेत. उद्योग, शिक्षण, संस्कृतीचे मोठ्या प्रमाणात आदानप्रदान झालेले आहे. दोन्ही देशांमधील या नात्याचा सुवर्णमहोत्सव साजरा केला जात आहे. पुढील काळात उभय देशांतील परस्परसंबंध सर्वच आघाड्यांवर अधिक वृद्धिंगत व्हावेत, असे प्रतिपादन दक्षिण कोरियाचे भारतातील राजदूत चांग जे. बोक यांनी केले.

इंडो-कोरियन सेंटरमध्ये किंग सेजोंग इन्स्टिट्यूटचे उद्घाटन चांग जे बोक यांच्या हस्ते झाले. प्रसंगी दक्षिण कोरियाचे मुंबईतील कॉन्सुल जनरल किंम यंग ओग, इंडो-कोरियन सेंटरचे सहसंस्थापक संजीब घटक, किंग सेजोंग इन्स्टिट्यूटच्या केंद्र संचालिका डॉ. इउन्जु लिम, युथबिल्ड फाउंडेशनचे चेअरमन व व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. प्रदीप बावडेकर, डॉ. आदित्य बावडेकर आदी उपस्थित होते.
चांग जे बोक म्हणाले, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय अशा सर्वच क्षेत्रांत दोन्ही देशांमध्ये गेल्या 50 वर्षांपासून मैत्रीचे व भागीदारीचे संबंध आहेत.

भारतीय संस्कृती, आदरातिथ्य, येथील खाद्यपदार्थ, व्यवसाय व शिक्षणासाठी अनुकूल वातावरण यामुळे कोरियातील अनेक कंपन्या भारताला प्राधान्य देतात. 28 बिलियन अमेरिकन डॉलर इतकी उलाढाल या दोन्ही देशांत होत आहे. भविष्यात भारतामध्ये कोरियन शिक्षण संस्था किंवा विद्यापीठ स्थापन करण्याचा विचार आहे. आगामी काळात भारत जगातील प्रमुख देशांपैकी एक असेल. व्यक्तिशः मला भारतीय संगीत, गाणी, चित्रपट, जिलेबी, गुलाबजाम आदी पदार्थ फार आवडतात, असेही चांग जे. बोक यांनी नमूद केले.

किम यंग ओग यांनीही या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून अधिकाधिक विद्यार्थी, नोकरदारांना कोरियन भाषा, संस्कृती आत्मसात करण्यासाठी मदत होईल. आमच्या कार्यक्षेत्रात ही इन्स्टिट्यूट येत असून, याला सर्वोत्तम बनवण्यासाठी लागणारी सर्व प्रकारची मदत आम्ही करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. या वेळी कोरियन आणि भारतीय नृत्य व गायन संस्कृतीच्या एकत्रित सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. डॉ. इउन्जू लिम यांनी प्रास्ताविक केले. डॉ. इउन्जू लिम यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा

Back to top button