रंगभूमीची दारे माझ्यासाठी पुणेकरांनी उघडली : दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे | पुढारी

रंगभूमीची दारे माझ्यासाठी पुणेकरांनी उघडली : दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ‘पुण्याशी माझे खूपच जिव्हाळ्याचे नाते आहे. मी माझे पहिले ‘टुरटूर’ हे व्यावसायिक नाटक 1983 साली रंगभूमीवर आणले. मुंबईत नाटकाचे 7 – 8 प्रयोग केले. पण, तेथे तिकीट विक्रीचे आकडे कधीही 300 – 400 रुपयांच्यावर गेले नाहीत. अशा परिस्थितीत मी या नाटकाचा प्रयोग पुण्यात भरत नाट्यमंदिरात केला. तो प्रयोग हाऊसफुल्ल झाला. त्यानंतर काही ठिकाणी नाटकाचा प्रयोग हाऊसफुल्ल झाला. माझ्यासाठी व्यावसायिक रंगभूमीचे दरवाजे पुणेकरांनी आणि पुण्याने उघडले,’ अशी भावना ज्येष्ठ दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा स्मृतिदिन आणि यशवंराव चव्हाण नाट्यगृहाचा वर्धापनदिन तसेच ज्येष्ठ लेखक प्रभाकर पेंढारकर यांचा स्मृतिदिन आणि रंगकर्मी दिनानिमित्त नाट्य परिषदेच्या कोथरूड शााखेच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात यंदाचा ‘यशवंत – वेणू’ पुरस्कार पुरुषोत्तम बेर्डे आणि अनिता बेर्डे यांना ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अनिता बेर्डे यांचा स्वप्नाली गोखले यांच्या हस्ते सन्मान केला. पृथ्वीराज सुतार, अमित गोखले, कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, सत्यजित धांडेकर, समीर हंपी आणि प्रदीप गुप्ते उपस्थित होते.

राजदत्त यांनी पुरुषोत्तम बर्डे यांनी नाटक, चित्रपट, जाहिरात, माहितीपट अशा क्षेत्रात काम केले आहे. त्यांनी निखळ आनंद रसिकांना मिळवून दिला, असे सांगितले. या पुरस्कार वितरणानंतर राजदत्त यांच्याशी शिरीष कुलकर्णी यांनी संवाद साधला. त्यांच्या चित्रपटातील लोकप्रिय गाण्यांचा कार्यक्रम ‘या सुखांनो’ सादर करण्यात आला. चित्रपटातील गाणी गायक गफार मोमीन आणि मनीषा निश्चल यांनी सादर केली. त्यांना विवेक परांजपे, मंदार देव, अजय अत्रे, मंगेश जोशी साथसंगत केली.

हेही वाचा

जगातील पहिले इलेक्ट्रिक फ्लाईंग शिप

पारंपरिक व्यवसायाचे अर्थव्यवस्थेत मोठे योगदान : केंद्रिय मंत्री पीयुष गोयल

कामोठेसह पनवेल तालुक्याला भूकंपाचे सौम्य धक्‍के

 

Back to top button