हत्ती टाक्यात बुडणार्‍या विद्यार्थ्याचे वाचविले प्राण | पुढारी

हत्ती टाक्यात बुडणार्‍या विद्यार्थ्याचे वाचविले प्राण

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा :  सिंहगड किल्ल्यावरील अमृतेश्वर मंदिराजवळील हत्ती टाक्यात बुडणार्‍या शालेय विद्यार्थ्याचे पर्यटकासह सुरक्षारक्षकांनी प्राण वाचविले. अरमान शेख (वय 13, रा. मुंढवा, पुणे) असे जीवदान मिळालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. हा प्रकार रविवारी (दि. 19) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडला. अरमान शेख हा आईवडिलांसह सिंहगडावर पर्यटनासाठी आला होता. आईवडिलांची नजर चुकवून अरमान हत्ती टाक्याच्या कठड्यावर गेला. चालताना पाय घसरून तो टाक्यात पडला. काही क्षणातच तो बुडू लागला. त्या वेळी तेथे असलेल्या शिवणे येथील पर्यटक कैलास लांगडे यांच्यासह वन विभागाचे सुरक्षारक्षक स्वप्निल सांबरे, नंदू जोरकर, सुमीत रांजणे यांनी टाक्याकडे धाव घेतली. या युवकांनी धाडस दाखवत अरमानला टाक्यातून बाहेर काढले. अरमानला जीवदान मिळाल्याने त्याच्या आईवडिलांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.

सिंहगड वन विभागाचे वनपरिमंडलाधिकारी समाधान पाटील म्हणाले की, गडावरील धोकादायक पाण्याच्या टाक्याच्या तटबंदी, कठड्यावर पर्यटकांनी जाऊ नये, यासाठी संरक्षित रेलिंग लावलेले आहेत. असे असताना उत्साही पर्यटक रेलिंगच्या आत जाऊन तसेच तटबंदीवर उभे राहून फोटो काढत आहेत. पर्यटकांना सुरक्षिततेबाबत वारंवार सूचना दिल्या जातात. सुरक्षारक्षक नितीन गोळे यांनी पर्यटकांनी धोकादायक तळे, बुरुज अशा धोकादायक ठिकाणी उतरू नये, असे आवाहन केले आहे.

Back to top button