पंचगंगा नदीत बुडून पुलाची शिरोलीत दोघांचा मृत्यू; एकाचा मृतदेह सापडला | पुढारी

पंचगंगा नदीत बुडून पुलाची शिरोलीत दोघांचा मृत्यू; एकाचा मृतदेह सापडला

शिरोली एमआयडीसी; पुढारी वृत्तसेवा : पंचगंगा नदीत बुडून पुलाची शिरोलीतील दोघांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. १८) रोजी सकाळी उघडकीस आली. विजय माळी व संतोष नाळे अशी बुडालेल्या दोघांची नावे आहेत. यापैकी संतोष नाळेचा मृतदेह पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर सापडला असून अद्याप दुसऱ्याचा मृतदेह शोधण्याचे काम सुरु आहेत.

संबंधित बातम्या 

याबाबत शिरोली पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, विजय माळी हा प्लंबिंगचे काम करीत होता. शुक्रवारी विजय माळी व संतोष नाळे हे दोघेजण कामासाठी बाहेर गेले होते. त्यानंतर ते रात्री उशिरापर्यत घरी न आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी मित्र आणि नातेवाईकांकडे चौकशी केली. शुक्रवारी वेळ झाल्याने शनिवारी सकाळपासून पुन्हा दोगांचा शोध सुरू केला होता. दरम्यान पंचगंगा नदीवरील वळीवडे धरणाजवळ मासेमारीसाठी गेलेल्या नागरिकांना पंचगंगा नदीजवळ कपडे, मोबाईल फोन, चपला दिसून आल्या. त्यांनी वळीवडे गावातील पोलीस पाटील यांना याची माहिती दिली. त्यानंतर गांधीनगर व शिरोली पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले.

यानंतर पुलाची शिरोलीतील काही तरुणांना ही माहिती समजल्यानंतर तत्काळ घटनास्थळी जावून त्यांनी कपडे व मोबाईल पाहून माळी व नाळे यांचेच ती असल्याची खात्री केली. त्यानंतर पोलीसांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दिवसभराच्या अथक प्रयत्नानंतर दोघापैकी नाळेचा मृतदेह पोलीसांना मिळाला आहे.

माळी व नाळे हे मद्यप्राशन करून आंघोळीसाठी पाण्यात गेले असता ते बुडाले असतील असा प्राथमिक अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे. शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे स. पोलिस निरिक्षक पंकज गिरी यांच्यांसह पोलिस कर्मचारी, कोल्हापूरातुन एक पाणबूडी, बोट पथक, वळिवडे व शिरोली येथील पट्टीचे पोहणारे युवक या शोध मोहिमेत सहभागी झाले होते. या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली आहे.

Back to top button