अकलूज; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने धाराशिव येथे होणाऱ्या ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील उपविजेता ठरणाऱ्या उपमहाराष्ट्र केसरी मल्लाला कै. प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या स्मरणार्थ चांदीची गदा देण्यात येणार आहे. धवलनर, प्रतापगड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी ही माहिती दिली.
संबंधित बातम्या
यावेळी महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब मगर, मुन्ना डमरे, ज्ञानदेव पालवे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. धवलसिंह मोहिते- पाटील म्हणाले की, 'कै. प्रतापसिंह मोहिते पाटील हे स्वतः चांगले मल्ल होते. त्यांना कुस्तीची आवड होती. त्यांनी अनेक मल्ल निर्माण केले. कुस्तीगीर परिषदेच्या वतीने होणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही मॅट व माती या दोन विभागातून प्रथम येणाऱ्या मल्लांमध्ये लढवली जाते. दोन्हीही मल्ल प्रथम क्रमांकाचे असल्याने ताकतीचेच असतात. काही गुणांच्या वरती हार -जीत ठरते.'
विजयी उमेदवाराला महाराष्ट्र केसरीची गदा दिली जाते. परंतु उपविजेता मल्ल हा तितक्याच ताकतीचा असतो. त्यांच्या मनामध्ये पराभवाची भावना येऊ नये, यासाठी चांदीची गदा डॉ. धवलसिंह मोहिते पाटील कुटुंबीयांच्या वतीने आपण देणार असल्याचे सांगितले.
माळशिरस तालुक्यातील अनेक मल्ल महाराष्ट्र केसरी, ऑलंपिक स्पर्धेपर्यंत गेली पाहिजेत, यासाठी आपले प्रयत्न करत असल्याचे डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले. या कार्यक्रमात सुधीर रास्ते यांनी आभार मानले. यावेळी अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.