Wankhede pitch controversy | वानखेडेची खेळपट्टी खरंच बदलली का?, गावस्कर भडकले, समोर आले सत्य | पुढारी

Wankhede pitch controversy | वानखेडेची खेळपट्टी खरंच बदलली का?, गावस्कर भडकले, समोर आले सत्य

पुढारी ऑनलाईन : एकदिवसीय विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीतील सामन्यात (IND vs NZ Semi Final) भारताने न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना झाला. या सामन्यादरम्यान वानखेडेवरील खेळपट्टीवरुन सोशल मीडियावर वाद पाहायला मिळाला. हा सामना सुरू होण्यापूर्वी एका परदेशी मीडिया आउटलेटने दावा केला की खेळपट्टी संथ असावी अशी भारतीय संघ व्यवस्थापनाने विनंती केल्यानंतर त्यानुसार खेळपट्टीत बदल करण्यात आला. पण याबाबत आयसीसीनेही निवेदन दिले आहे. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर (Former cricketer Sunil Gavaskar) आणि इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू मायकल वॉन यांनीही या वादावर मत व्यक्त केले आहे. (Wankhede pitch controversy)

संबंधित बातम्या 

काय आहे वाद?

ब्रिटीश वृत्तपत्र ‘डेली मेल’ने त्यांच्या वृत्तात असा दावा केला आहे की, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यात ७ नंबरची खेळपट्टी वापरली जाणार होती. पण विश्वचषकात येथे खेळल्या गेलेल्या चार सामन्यांत या खेळपट्टीचा वापर केला नव्हता आणि ती पूर्णपणे नवीन खेळपट्टी आहे.

वृत्तात दावा करण्यात आला आहे की, “पण, मंगळवारी एका ग्रुपमध्ये ५० हून अधिक बीसीसीआय आणि आयसीसी अधिकार्‍यांना एक व्हॉट्स ॲप मेसेज पाठवण्यात आला. त्यात पुष्टी केली की पहिला उपांत्यफेरीचा सामना ६ क्रमांकाच्या खेळपट्टीवर होणार आहे. येथे इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका आणि भारत वि. श्रीलंका सामने खेळवले होते. या वृत्तात आयसीसीचे खेळपट्टी सल्लागार अँडी एटिंक्सन यांचा मेल आणि बीसीसीआयचा त्यावरील उत्तराचा उल्लेख आहे.

हा तर मुर्खपणा- गावस्कर

या वादावर गावस्कर यांनी स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हटले की, “ही खेळपट्टी फलंदाजीसाठी खूप चांगली आहे. यावर जवळपास ७३० धावा झाल्या. जे कोणी खेळपट्टीत बदल केला आहे आणि यामुळे भारतीय गोलंदाजांना फायदा होईल, असे बोलत आहेत ते मूर्ख आहेत. मला आशा आहे की ते गप्प बसतील.”

“खेळपट्टी जरी बदलली असली तरी ती दोन्ही संघांसाठी खेळ सुरू होण्यापूर्वी बदलली होती. ती डावाच्या मध्यात बदलली गेली नाही. नाणेफेक झाल्यानंतर ती बदलली गेली नाही. दोन्ही संघांसाठी खेळपट्टी सारखीच होती. तुमचा संघ चांगला आहे, तुम्ही त्या खेळपट्टीवर खेळता आणि तुम्ही जिंकता आणि भारताने ते केले आहे. त्यामुळे खेळपट्ट्यांबद्दल बोलणे थांबवा. आधीच ते अहमदाबाद (अंतिम सामन्याचे ठिकाण) मधील खेळपट्टीबद्दल बोलत आहेत. दुसरा उपांत्य फेरीचा सामनाही अजून झालेला नाही. तुम्ही आधीच अहमदाबादमधील खेळपट्टी बदलल्याबद्दल बोलत आहात,” असे गावस्कर पुढे म्हणाले.

“हा वाद निरर्थक आहे. नाणेफेकीनंतर खेळपट्टी बदलली तर वाद व्हायला हवा.” असेही पुढे त्यांनी नमूद केले आहे.

मायकल वॉन काय म्हणाला?

याप्रकरणी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यानेही प्रतिक्रिया दिली आहे. मायकेल वॉनने सोशल प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत म्हटले की, “ही एक साधी गोष्ट आहे, उपांत्य फेरीचा सामना नव्या खेळपट्टीवर खेळायला हवा.”

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या वादावर निवेदन जारी करत म्हटले आहे की, आयसीसीच्या सल्लागाराला या बदलाची माहिती देण्यात आली होती.

ICC चे म्हणणे

ESPNcricinfo च्या माहितीनुसार ICC ने म्हटले आहे, “स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात नियोजित खेळपट्टीच्या रोटेशनमध्ये बदल सामान्य आहेत आणि यापूर्वीही असे दोन वेळा झाले आहेत. हा बदल आमच्या यजमानाच्या संयोगाने व्हेन्यू क्युरेटरच्या शिफारशीनुसार करण्यात आला आहे. आयसीसीच्या खेळपट्टी सल्लागाराला याची माहिती देण्यात आली होती. खेळपट्टीत बदल आणि त्यावर चांगले खेळायला होणार नाही हे मानण्याचे कोणतेही कारण नाही.”

हे ही वाचा :

 

Back to top button