‘कृपया शमीला अटक करु नका’ : दिल्‍ली-मुंबई पोलिसांची भन्‍नाट पोस्ट चर्चेत | पुढारी

'कृपया शमीला अटक करु नका' : दिल्‍ली-मुंबई पोलिसांची भन्‍नाट पोस्ट चर्चेत

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : टीम इंडियाने बुधवारी विश्‍वचषक स्‍पर्धेतील ( ICC world cup 2023 ) उपांत्‍य फेरीत न्‍यूझीलंडचा पराभव करत मोठ्या दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली. भारताचा विजयाचा शिल्‍पकार ठरला वेगवान गोलंदाज मोहम्‍मद शमी (Mohammed Shami ). त्‍याने ७ विकेट घेत भारताचा विजय निश्‍चित केला. त्‍याच्‍या या अविस्‍मरणीय कामगिरीबद्दल दिल्ली पोलिसांनी ( Delhi Police)  मुंबई पोलिसांना टॅग करत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक मजेदार पोस्ट केली. त्‍याला मुंबई पोलिसांनीही (Mumbai Police ) तितकेच भारी उत्तर दिले. या दोन्‍ही पोस्‍ट तुफान व्‍हायरल होत आहे. ( Mohammed Shami IND vs NZ Semifinal )

विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव करून भारताने चौथ्यांदा विश्‍वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ४ गडी गमावून ३९७ धावा केल्या होत्या, तर न्यूझीलंडचा संपूर्ण संघ ४८.५ षटकात ३२७ धावा करत सर्वबाद झाला होता. भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने अप्रतिम गोलंदाजी करत ५७ धावांत ७ बळी घेतले.

दिल्‍ली पोलिसांच्‍या पोस्‍टला मुंबई पोलिसांचेही तितकेच भारी उत्तर

शमीच्या या शानदार कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोशल मीडियावर शमी अजूनही ट्रेंडमध्ये आहे. शमीच्या कामगिरीबद्दल, दिल्ली पोलिसांनी मुंबई पोलिसांना टॅग केले आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केली आहे. यामध्‍ये दिल्ली पोलिसांनी लिहिले की, ‘मुंबई पोलीस, आम्हाला आशा आहे की आज झालेल्या हल्ल्यासाठी तुम्ही मोहम्मद शमीला अटक करणार नाही.’

मुंबई पोलिसांनीही दिल्ली पोलिसांच्या पोस्टला तत्काळ प्रतिसाद देत लिहिले, ‘दिल्ली पोलिस, तुम्ही असंख्य लोकांची मने चोरण्यासाठी कलम लावण्यास विसरलात आणि सहआरोपींची यादीही दिली नाही.’ येथे मुंबई पोलिस सामनाच्या नायक विराट कोहली, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, केएल राहुल यांच्याकडे बोट दाखवत होते, ज्यांच्याबद्दल दिल्ली पोलिसांनी कोणताही शोध घेतला नव्हता. काही वेळातच ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली.

शमीच्‍या भेदक गाेलंदाजीमुळे भारताचा विजय सुकर : Mohammed Shami IND vs NZ Semifinal

उपांत्‍य फेरीत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने न्यूझीलंडला 397 धावांचे मोठे लक्ष्य दिले होते. तेव्हा टीम इंडिया हा सामना सहज जिंकेल, असा अंदाज व्‍यक्‍त होत होता. यानंतर न्यूझीलंडचा संघ फलंदाजीला आला तेव्हा त्याची सुरुवात खराब झाली आणि 39 धावांवर दोन गडी बाद झाले; पण यानंतर मिशेल आणि कर्णधार केन विल्यमसन यांनी तिसऱ्या विकेटसाठी वेगवान १८१ धावांची भागीदारी करत सामन्‍यावर पकड निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न केला. कर्णधार रोहित शर्माने पुन्हा एकदा शमीकडे चेंडू सोपवला. शमीने केन विल्यमसनची विकेट घेत न्‍यूझीलंडच्‍या धावसंख्‍येला ब्रेक लावाला. याच षटकात त्‍याने दोन बळी घेतले. यानंतर न्यूझीलंड संघ दडपणाखाली आला. मात्र, फिलिप्स आणि मिशेल यांच्यात पाचव्या विकेटसाठी 75 धावांची भागीदारी झाली जी बुमराहने मोडली. नंतर शमीने आणखी 3 विकेट घेतल्या आणि न्‍यूझीलंडचा डाव 327 धावांवर आटाेपला. या शानदार कामगिरीसाठी शमीला ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हणून गौरविण्यात आले.

हेही वाचा : 

 

 

 

Back to top button