कोल्हापूर : एसटीला एका दिवसात कोटीचे उत्पन्न | पुढारी

कोल्हापूर : एसटीला एका दिवसात कोटीचे उत्पन्न

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दिवाळी सणावेळी प्रवाशांनी एसटी बसला गर्दी केल्याने महामंडळाच्या कोल्हापूर विभागाची यंदा दिवाळी झाली. शनिवारी (दि. 11) एका दिवसात तब्बल 1 कोटी 6 लाख 92 हजार 349 रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले. पुणे, मुंबईसह विविध मार्गांवर सोडण्यात आलेल्या 150 जादा गाड्यांतून तब्बल 17 लाख रुपयांचा व्यवसाय झाला. दिवाळीनिमित्त विविध बसस्थानकांना विद्युत रोषणाई करण्यात आली.

दिवाळी सणानिमित्त विविध भागांत विखुरलेले कोल्हापूरकर कोल्हापुरात येतात. त्यामुळे एसटी बसेसना मोठ्या प्रमाणात गर्दी होते. दिवाळी सण कॅश करण्यासाठी महामंडळही प्रयत्न करीत असते. त्याचाच भाग म्हणून विविध मार्गांवर जादा गाड्या सोडण्यात येतात. गेल्या चार ते पाच दिवसांत विविध मार्गांवर सुमारे 100 ते 150 जादा गाड्या धावत आहेत. शनिवारी विविध मार्गांवरील गाड्यांना प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळाला. शनिवारी एका दिवसात 1 कोटी 6 लाख 92 हजार 349 रुपयांचे उत्पन्न मिळाले. यामध्ये 150 जादा गाड्यांच्या माध्यमातून तब्बल 17 लाखांचा व्यवसाय झाला.

जिल्ह्यातील 12 आगारांमध्ये कोल्हापूर आगाराने सर्वाधिक म्हणजे 20 लाख 12 हजार 175 रुपये उत्पन्न मिळविले. जिल्ह्यातील इतर आगारातील उत्पन्न पुढीलप्रमाणे ः संभाजीनगर-11 लाख 1 हजार 78 रुपये, इचलकरंजी-12 लाख 90 हजार 825 रुपये, गडहिंग्लज-9 लाख 23 हजार 545 रुपये, गारगोटी-12 लाख 40 रुपये, मलकापूर-6 लाख 57 हजार 897 रुपये, चंदगड-7 लाख 49 हजार 110 रुपये, कुरूंदवाड-5 लाख 73 हजार 553 रुपये, कागल-7 लाख 17 हजार 102 रुपये, राधानगरी-6 लाख 67 हजार 907 रुपये, गगनबावडा-1 लाख 69 हजार 45 रुपये, आजरा-6 लाख 23 हजार 72 रुपये. रविवारीही महामंडळाच्या विविध मार्गांवरील बसेसना मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होती.

Back to top button