Pune News : कुरकुंभ परिसर कायम प्रदूषणात! | पुढारी

Pune News : कुरकुंभ परिसर कायम प्रदूषणात!

कुरकुंभ : पुढारी वृत्तसेवा : दिवाळी सण आला की, सर्वत्र प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा निर्धार करण्यात येतो. खरेतर ही अत्यंत कौतुकास्पद बाब म्हणावी लागेल. मात्र, दौंड तालुक्यातील कुरकुंभ आणि पांढरेवाडी या दोन्ही गावांची परिस्थिती या निर्धाराविरुध्द आहे. येथील ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळीसह वर्षभरातील सर्वच सण भयानक अशा प्रदूषणात साजरे करीत असल्याचे चित्र आहे.
कुरकुंभ औद्योगिक क्षेत्र रासायनिक झोन असून, कारखान्यांसाठी नियम, अटी आणि शर्ती अतिशय कडक आहेत. मात्र, काही कारखाने शासनाच्या बहुतांश नियमांना तिलांजली देत कारभार करतात. परिणामी, कुरकुंभ व पांढरेवाडी परिसरात कायम प्रदूषणाचा प्रश्न ’आ’ वासून उभा असतो. केमिकल झोनमुळे शासनाच्या सर्व नियमांत राहणे गरजेचे आहे; परंतु तसे दिसत नाही.

औद्योगिक क्षेत्राच्या माध्यमातून उद्योगधंदे सुरू झाल्यावर आपल्या व इतर मुली, मुलांच्या नोकर्‍यांचा प्रश्न सुटून परिसरात आर्थिक सबत्ता येईल या आशेने अनेक शेतकर्‍यांनी आपल्या जमिनी औद्योगिक क्षेत्रासाठी दिल्या. यानंतर काही दिवसांनी विविध कारखान्यांची उभारणी झाली. मात्र, अपेक्षित असे न घडता सर्वच उलट घडत आहे.

स्थानिकांच्या नोकऱ्या, गंभीर प्रदूषण, कारखान्यांची मनमानी, खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या असे अनेक प्रश्न नेहमी निर्माण होतात. वारंवार नियमांना केराची टोपली दाखवली जात असल्यामुळे कारखान्यांतील अपघात, आग, स्फोट अशा घटना थांबायला तयार नाहीत. वाढत्या अपघातांचे कारखान्यांना अजिबात गांभीर्य राहिलेले नाही.

घातक रसायनमिश्रीत दूषित सांडपाण्यामुळे काही शेतकर्‍यांच्या लाखमोलाच्या शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ओढे, नाले, तलावही सांडपाण्यातून बचावलेले नाहीत. गेल्या 25 ते 30 वर्षांपासून येथील जमिनीत इतक्या मोठ्या प्रमाणात सांडपाणी मुरले आहे की, विचारता सोय नाही. लगतच्या परिसरात कुठेही खड्डा खोदला की उग्र दुर्गंधीचे सांडपाणी बाहेर येते. अशा विविध कारणांमुळे कुरकुंभ, पांढरेवाडी, यासह इतर परिसरात कायमच प्रदूषण सुरू असते.

हेही वाचा

Back to top button