Pimpri News : पाण्याच्या टाकीसाठी जागा द्या! आमदाराने लावले फ्लेक्स | पुढारी

Pimpri News : पाण्याच्या टाकीसाठी जागा द्या! आमदाराने लावले फ्लेक्स

वडगाव मावळ : पुढारी वृत्तसेवा : मावळ तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर आहेत, परंतु, जागाच मिळत नसल्याने संबंधित योजना रखडल्या आहेत. यासाठी आमदार सुनील शेळके यांनी थेट संबंधित गावांमध्ये फ्लेक्स लावून स्थानिक नेते व ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीसाठी जागा उपलब्ध करून द्यावे, असे जाहीर आवाहन केले आहे.

मावळात नऊ धरणे असूनदेखील नागरिकांना मात्र पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत होते. विशेषतः महिलांना पाणी आणण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो. आमदार शेळके यांनी निवडणुकीआधी दिलेला शब्द पाळून प्रत्येक घरापर्यंत पाणी आणण्याचे स्वप्न सत्यात साकारले. यासाठी प्रत्येक स्तरावर पाठपुरावा, वेळोवेळी संयुक्त बैठका घेऊन ही कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले आहेत.तालुक्यात जलजीवन मिशनअंतर्गत सुमारे 112 पाणी योजनांचे काम सुरु आहे.

अनेक योजनांचे काम अंतिम टप्प्यात आहे; परंतु काही गावातील तांत्रिक अडचणीमुळे कामांना विलंब होत आहे. वारंवार पाठपुरावा करुनदेखील स्थानिक लोकप्रतिनिधी, पुढारी मंडळी, ग्रामस्थ गांभीर्याने घेत नसल्यामुळे अखेर आमदार शेळके यांनी गावात बॅनर लावून जाहीर आवाहन केले आहे. तालुक्यात अनेक दानशूर व्यक्तींनी पाण्याच्या टाकीसाठी जागेसाठी जागा देऊन गावाचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडवण्यासाठी योगदान दिले आहे.

अनेक कुटुंबांनी दातृत्वाचा आदर्श या माध्यमातून समाजासमोर ठेवला आहे. तालुक्यातील गावांच्या विकासासाठी मूलभूत आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर असतो. त्यासाठी पुरेसा निधी विविध माध्यमांतून उपलब्ध करण्यात येतो. परंतु संबंधित विकासकामांच्या उभारणीसाठी ग्रामपंचायतीकडे जागाच उपलब्ध नसते. केवळ जागेअभावी गावाच्या विकासाला खीळ बसू नये. ही यामागची भावना असल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले.

जागेअभावी पाणीपुरवठा योजना रखडलेली गावे

आंबळे (10 हजार लि.), भाजगाव (17 हजार लि.), गोवित्री (58 हजार लि.) नागाथली (8 हजार लि.), सांगिसे (10 हजार लि.), थोरण (20 हजार लि.), शिरदे (17 हजार लि.), शिवली (61 हजार लि.), भडवली (42 हजार लि.), गेव्हंडे खडक (20 हजार लि.), पांगळोली (85 हजार लि.), वारू (28 हजार लि.), कादव, वाघेश्वर (26 हजार लि.)

हेही वाचा

 

Back to top button