आपले हृदय निरोगी आहे? | पुढारी

आपले हृदय निरोगी आहे?

डॉ. बिपीनचंद्र भामरे

हृदय हा आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे आणि आपले हृदय कार्यक्षम राहण्यासाठी दररोज शारीरिक व्यायामाला आणि पौष्टिक आहारास प्राधान्य देणे गरजेचे आहे. एकेकाळी वृद्धांमध्ये आढळून येणारा हृदयविकाराचा झटका आता तरुण आणि लहान मुलांमध्येही दिसून येतो. हृदयाच्या समस्यांबद्दलची लक्षणेवेळीच ओळखून त्यानुसार उपचार करणे अमूल्य जीवन वाचविण्यास मदत करते.

थकवा येणे, सूज येणे, डोकं दुखणे, हृदयाची अनियमित ठोके आणि छातीत अस्वस्थता जाणविणे यासारख्या लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नये. त्याऐवजी लोकांनी त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. हृदयविकाराच्या धोक्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर तसेच जीवघेणे परिणाम होऊ शकतात. काही अत्यंत महत्त्वाची लक्षणे आहेत ज्याकडे दुर्लक्ष करू नये.

  • छातीत तीव्र वेदना आणि अस्वस्थता जाणवणे : छातीत वेदना होणे किंवा अस्वस्थता हे हृदयविकाराचे संकेत देतात. या वेदनांमुळे छाती जड होणे, हृदयावर दाब येणे किंवा जळजळ अशी लक्षणे दिसतात तसेच हात, मान, जबडा किंवा पाठीवर देखील परिणाम होऊ शकतो.
  •  श्वासोच्छवासासंबंधित समस्या : हलक्या क्रिया करत असताना किंवा विश्रांतीच्या वेळी श्वास घेण्यास त्रास होणे, गुदमरल्यासारखे वाटणे हेदेखील हृदयविकारासंबंधीत लक्षण असू शकते.
  • थकवा येणे : दैनंदिन कामात अडथळा आणणारा थकवा हादेखील हृदयविकाराचे लक्षण असू शकते. तुमचे हृदय कार्यक्षमतेने रक्त पंप करू शकत नसेल, तर त्याचा परिणाम म्हणून शारीरिक ऊर्जेची पातळी कमी होऊ शकते.
  •  हृदयाचे अनियमित ठोके : छातीत धडधडणे किंवा हृदयाचे अनियमित ठोके याकडे बारकाईने लक्ष द्या. अनियमित हृदयाचा ठोका, ज्याला एरिथमिया म्हणून ओळखले जाते, हे अधिक गंभीर हृदयविकाराचे संकेत असू शकते.
  • पाय, घोटे किंवा ओटीपोटात सूज येणे हे देखील हार्ट फेल्युअरचा संकेत देते. जेव्हा हृदयाला रक्त पंप करण्यास अपयश येते तेव्हा शरीरात द्रव जमा होतो ज्यामुळे सूज येते.
  • डोके दुखी, चक्कर येणे किंवा मुर्च्छा येणे हे मेंदूला अपुरा रक्तपुरवठा होण्याचे कारण असू शकते आणि त्या थेट हृदयविकाराशी संबंध येतो.
  •  जास्त घाम येणे हा हृदयासंबंधित आजार विशेषत: हृदयविकाराचा झटका, छातीत अस्वस्थता जाणवणे किंवा श्वास घेण्यात अडचणी येणे यासारख्या इतर लक्षणांसह सूचित करू शकतो.
  •  हृदयविकाराचा झटका किंवा इतर हृदयाशी संबंधित समस्यांमुळे मळमळ किंवा उलट्या होणे सामान्य आहे. विशेषतः स्त्रियांमध्ये अशी लक्षणे दिसतात. दुर्दैवाने या पचनासंबंधित समस्या समजून याकडे दुर्लक्ष केले जाते.
  • शरीराच्या वरच्या भागात होणार्‍या वेदना : स्त्रियांना हृदयाच्या समस्या होत असतील, तर त्यांना पोटाच्या वरच्या भागात, हातांमध्ये, खांद्यावर, मान किंवा जबड्यात वेदना किंवा अस्वस्थता जाणवू शकतात.
  • डाव्या खांद्यावर वेदना किंवा दाब जाणवणे हे हृदयासंबंधित समस्येचे लक्षण आहे. डाव्या हाताला किंवा खांद्यावर सतत वेदना होत असतील किंवा अनावश्यक दाब जाणवत असेल विशेषत: श्वास घेण्यात अडचण यासारख्या हृदयविकाराच्या इतर लक्षणांशी संबंधित लक्षणे आढळल्यास तत्काळ वैद्यकीय मदत घेणे आवश्यक ठरते.
  • वेळीच निदान आणि उपचार केल्यास एखाद्याचे प्राण वाचू शकतात. दिवसातून कमीत कमी 30 मिनिटे मध्यम शारीरिक हालचाली केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते. चालणे, पोहणे, सायकल चालवणे किंवा नृत्य करणे यासारख्या क्रियांची निवड केल्याने केवळ हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचे आरोग्य सुधारत नाही, तर वजन नियंत्रित ठेवण्यात आणि तणावाची पातळी कमी करण्यास मदत होते.
  • रात्रीची चांगली झोप ही हृदयाच्या आरोग्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. पुरेशी झोप न झाल्यास उच्च रक्तदाब आणि कोरोनरी धमनी रोग यांसारख्या विविध हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या विकसित होण्याचा धोका असतो. पुरेशी झोप घेणे, आरामदायी झोपेचे वातावरण तयार करणे आणि झोपण्यापूर्वी इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापर न करणे हे हृदयाच्या आरोग्यामध्ये महत्त्वाच्या भूमिका बजावतात. आपल्या आहारात चरबीचे निरोगी स्रोत समाविष्ट केल्याने हृदयाच्या कार्यास चालना मिळते. आहारातील फॅटस् पूर्णपणे टाळण्याऐवजी अ‍ॅव्होकॅडो, सुकामेवा, तेलबिया आणि फॅटी सिड यासारख्या पदार्थांमध्ये चांगले फॅटस् असतात. अशा पदार्थांचा दैनंदिन आहारात गरजेनुसार समावेश करावा.

Back to top button