सातार्‍यात महायुतीची मुसंडी; ‘महाविकास’ची घसरगुंडी | पुढारी

सातार्‍यात महायुतीची मुसंडी; ‘महाविकास’ची घसरगुंडी

सातारा; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात चुरशीने झालेल्या 64 ग्रामपंचायतींमधील निवडणूक निकालाचे फटाके सोमवारी फुटले असून, त्यामध्ये महायुतीचा झेंडा फडकला. भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट या महायुतीतील घटकपक्षांनी जोरदार मुसंडी मारली असून, महाविकास आघाडीची घसरगुंडी झाली आहे.

सातारा, वाई, जावली, माण, खटाव, कोरेगाव या तालुक्यांमध्ये महायुतीने बाजी मारली. तर कराड तालुक्यात मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाने निर्विवाद वर्चस्व मिळवले. फलटण येथे राजे गट व खासदार गट यांना फिफ्टी फिफ्टी संधी मिळाली. पाटणमध्ये देसाई गटाने वरचष्मा मिळवला. राष्ट्रवादी व शिवसेनेत पडलेली फूट महाविकास आघाडीची पीछेहाट करणारी ठरली. दरम्यान, एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या सातारा जिल्ह्यातील वर्चस्वाला भाजपने सुरूंग लावत ग्रामपंचायतींमध्ये जोरदार मुसंडी मारल्याचे स्पष्ट दिसत आहे. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटानेही काही ग्रामपंचायतींमध्ये करिष्मा दाखवला.

सांगलीत महायुतीचा 30 ग्रामपंचायतींवर झेंडा

सांगली ः जिल्ह्यात अत्यंत चुरशीने झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप, शिवसेना (शिंदे गट) 30, तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (ठाकरे गट) मिळून 40 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले. स्थानिक आघाड्यांनी 13 ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावला. खानापूर तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींवर काँग्रेस व भाजपनेही दावा केला.

जिल्ह्यातील तहसील मुख्यालय व अप्पर तहसील अशा बारा ठिकाणी मतमोजणी झाली. सकाळी नऊ वाजता सुरु झालेली मतमोजणीची प्रक्रिया सकाळी 11 वाजता पूर्ण झाली. निकाल लागताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. फटाक्याची आतषबाजी व गुलालाची उधळण केली. कडेगाव तालुक्यातील चिंचणी, उपाळे मायणी व शाळगाव या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत काँग्रेसने चिंचणी आणि शाळगाव या दोन ग्रामपंचायतींचे सरपंचपद व सत्ता मिळवत वर्चस्व कायम राखले.

सिंधुदुर्गात भाजपचा वरचष्मा

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने 23 ग्रा.पं. पैकी 14 जागांवर विजय मिळविला. शिवसेना ठाकरे गटाला केवळ 5 ग्रा.पं.वर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या हाती एकही ग्रा.पं. लागली नाही. तीच स्थिती विरोध काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटाची झाली.

रत्नागिरीत शिंदे गटासह अजित पवार गटाचे वर्चस्व

रत्नागिरी : ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे गटाने बाजी मारत वर्चस्व राखले आहे. संगमेश्वरमध्ये भाजपने ठाकरे गटाला धोबीपछाड दिला आहे. राजापूर मतदारसंघात लांजा तालुक्यात पालकमंत्री उदय सामंत यांच्या पदाधिकार्‍यांनी बाजी मारत ठाकरे गटाच्या आमदारांना शह दिला आहे.

Back to top button