लवंगी मिरची : माणसाचे ‘नवे शत्रू’ | पुढारी

लवंगी मिरची : माणसाचे ‘नवे शत्रू’

हे पहा मंडळी, तुम्हाला नेहमी वाटते ना की, आपल्यासारख्या विकसनशील देशामध्ये ज्या समस्या आहेत, त्या विकसित देशांना अजिबात नाहीत? तुमचा विचार साफ चुकीचा आहे, हे आधी लक्षात घ्या. म्हणजे बघा, फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे ढेकणांचा सर्वव्यापी संचार झालेला असून, जगातील अत्यंत लोकप्रिय असणारे हे पर्यटन स्थळ ढेकणांमुळे त्रासून गेलेले दिसून येत आहे. मेट्रो, बस स्टेशन, सिनेमा थिएटर, हॉटेल, शाळा, रुग्णालये सांरख्या सर्व सार्वजनिक ठिकाणी ढेकूण दिसत असून, पर्यटक आणि स्थानिक लोकही त्यामुळे हैराण झाले आहेत. त्यात पुन्हा 2024 च्या उन्हाळ्यामधील ऑलिम्पिक स्पर्धांचे यजमानपद पॅरिसकडे आहे. अशा परिस्थितीत ढेकणांचा संसर्ग कसा कमी करता येईल याबाबत सर्व फ्रान्स चिंतेमध्ये आहे.

आपल्या भारत देशात ढेकूण फार प्रचंड प्रमाणात होते; परंतु गेल्या वीस वर्षांत कशामुळे काय माहीत नाही, त्यांची संख्या कमी झाली आहे. आपल्याकडे झुरळांचा त्रास जास्त आहे. हे जीव बहुधा मानवाच्या पूर्वीपण अस्तित्वात होते आणि त्यामुळेच ते अजून टिकून आहेत. समजा, हमास आणि इस्रायलमध्ये युद्ध वाढले आणि जग तिसर्‍या महायुद्धात लोटले गेले तर असे म्हणतात की, संपूर्ण जग जरी नष्ट झाले तरी झुरळ, ढेकूण आणि डास टिकून राहतील. समजा, तुमच्या घरात खूप झुरळे झाली आहेत. जाहिराती पाहून तुम्ही मोठ्या उत्साहात झुरळांना नष्ट करणारे फवारायचे औषध घेऊन येता. स्वयंपाकघर आणि घरातील असा भाग जिथे झुरळ दिसतात, त्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही भरपूर औषध फवारता. दुसर्‍या दिवशी 50 ते 100 झुरळे मरून पडलेली दिसतील; पण तिसर्‍या दिवशी तुमच्या लक्षात येईल की, दोन-चार बालझुरळे, ज्याला कॉन्व्हेंटमधील मुले बेबी कॉकरोच म्हणतात, ते युद्धभूमीची पाहणी करताना अवतरलेले दिसतील. लगेच पुढच्या पंधरा दिवसांमध्ये त्यांची संख्या प्रचंड वाढेल. याचा अर्थ, तुम्ही फवारलेल्या औषधाचा काहीही परिणाम झालेला नाही.

पॅरिसमध्ये दिसणार्‍या ढेकणांचे असेच झाले आहे. ढेकणांचा जगातील पहिला उल्लेख साडेतीन हजार वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये केलेला दिसतो. ढेकूण हे अतिथंड वातावरण ते साधारणत: पन्नास अंश सेल्सिअस इतक्या तापमानात राहू शकतात. ढेकूण पूर्वी उष्णकटिबंधीय विकसनशील देशांमध्ये म्हणजे भारतासारख्या देशांमध्ये दिसून येत असत. गेल्या काही दशकांपासून कॅनडा, अमेरिका, बि—टन, ऑस्ट्रेलिया, आफिका, चीन या देशांमध्ये ढेकणांच्या संसर्गात वाढ होताना दिसत आहे. उंच चढण्याच्या सवयीमुळे ढेकूण जगात कुठेही पोहोचू शकतात आणि पिढ्यान् पिढ्या त्याठिकाणी सुखेनैव संसार करत असतात. 2024 मध्ये होणार्‍या ऑलिम्पिकपूर्वी ढेकणांचा बंदोबस्त कसा करावा, ही फ्रान्सपुढे मोठी समस्या आहे. शत्रू देशांपासून आपला देश सुरक्षित ठेवणे एकवेळ सोपे आहे; पण या तुच्छ दिसणार्‍या शत्रूंपासून देशाला कसे वाचवायचे, हा फार मोठा प्रश्न आहे.

संबंधित बातम्या

पूर्वी डासांपासून वाचण्यासाठी मच्छरदाणी वापरायचे. तरीही ढेकूण मच्छरदाणीच्या आतमध्ये शिरून माणसाच्या शरीराला चावे घेण्याचे काम करत असत. ढेकूण मारायला जावे तर डास वाढतात आणि डास कमी करायला गेले की, झुरळे वाढतात. त्यामुळे या छोट्याशा कीटकांमुळे जगणे अवघड झाले आहे, असे म्हटले तर वावगे होणार नाही.

Back to top button