SARTHI Fellowship : सारथीद्वारे मिळणारी अधिछात्रवृत्ती कमी केल्याने मराठा संशोधक विद्यार्थी आक्रमक; बेमुदत साखळी उपोषण सुरु | पुढारी

SARTHI Fellowship : सारथीद्वारे मिळणारी अधिछात्रवृत्ती कमी केल्याने मराठा संशोधक विद्यार्थी आक्रमक; बेमुदत साखळी उपोषण सुरु

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत आहे. अशातच सरकारने सारथीकडून दिल्या जाणाऱ्या मराठा समाजातील पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांसाठी फेलोशिप कमी केली आहे.  सारथी संस्था सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी सुरू केली असताना असा  निर्णय का घेतला? या निर्णयामुळे मराठा समाजातील जे गोरगरीब, गुणवंत आणि होतकरु  विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. या पार्श्वभूमीवर  २०२३ मधील पात्र सारथी संशोधक विद्यार्थ्यांना तात्काळ सरसकट फेलोशिप देण्यात यावी, सारथी संशोधक विद्यार्थ्यांना बार्टी प्रमाणे विद्यापीठ नोंदणी दिनांकापासून अधिछात्रवृत्ती देण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसह सारथी संशोधक विद्यार्थ्यांनी  ‘सारथी’च्या कोल्हापूर विभागीय कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरु केले आहे. (SARTHI Fellowship )

SARTHI Fellowship : काय आहेत प्रमुख मागण्या

सारथी कृती समितीच्या नेतृत्वाखाली ‘सारथी’ च्या विद्यार्थ्यांचे आजपासून (दि.३०) उपोषण ‘सारथी’च्या कोल्हापूर विभागीय कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. राज्यभरात ठिकठिकाणी संशोधक विद्यार्थी आंदोलन, उपोषण करत आहेत.  सारथीसंशोधक विद्यार्थ्यांच्या पुढीलप्रमाणे मागण्या आहेत. २०२३ मधील पात्र सारथी संशोधक विद्यार्थ्यांना तात्काळ सरसकट अधिछात्रवृत्ती / फेलोशिप देण्यात यावी. सारथी संशोधक विद्यार्थ्यांना बार्टी प्रमाणे विद्यापीठ नोंदणी दिनांकापासून अधिछात्रवृत्ती देण्यात यावी यासह  सारथीने संशोधक फेलोशिपची संख्या ५० आहे. ५० विद्यार्थ्यांना न देता सरसकट विद्यार्थ्यांना द्यावी, सारथी प्रशासनाने सारथी कृतीसमितीच्या शिष्टमंडळाची मंत्र्यांबरोबर बैठक घडवून आणवावी या आहेत. 

संशोधक विद्यार्थी आक्रमक

सरकारने विद्यार्थी विरोधी घेतलेल्या भुमिकेमुळे संशोधक विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. संशोधक विद्यार्थी, अभय गायकवाड  म्हणतात,” या सरकारचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. २०१९ ते २०२२ पर्यंत सर्व पात्र सारथी संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देण्यात येत होती. मात्र यावर्षी २०२३ पासून ही संख्या केवळ ५० केली त्यांनतर २०० करण्यात आली. १४०० विद्यार्थी पात्र आणि फक्त २०० विद्यार्थ्यांना फेलोशिप असं कसं चालेल. असं जर सरकारने केलं तर, आम्ही आतापर्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन केले आहे पण जर सरकारने भूमिका बदलली नाही तर आम्ही राज्यभर तीव्र आंदोलन करू.”

वैष्णवी पाटील म्हणते, सारथी संस्था सरकारने समाज विद्यार्थी हितासाठी सुरू केली असताना असा दुजाभाव भेदभाव कशासाठी? सारथी ज्या हेतूने स्थापन केली आहे. त्या हेतूने विद्यार्थ्यांना फेलोशिप द्यावी. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांना घरातून  मिळणारी तुटपुंजी मदत व त्यात शैक्षणिक खर्चाचा ताळमेळ घालणे अशक्य आहे. सरकराला मला विचारायचं आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घरातील, शेतकऱ्यांच्या मुलांनी शिकायचं की नाही? विद्यार्थी हे देशाचे भवितव्य असते. जर देशाचे भवितव्य वारंवार रस्त्यावर उतरत असेल तर विचार करण्याची वेळ आली आहे. सरकारने याकडे वेळीच लक्ष घालावे.

आज आम्हा विद्यार्थ्यांवर उपोषण करण्याची वेळ आली आहे. 2023 सारथी संशोधक फेलोशिप संख्या फक्त 200 आहे. हा 200 चा आकडा आणि एकीकडे पात्र विद्यार्थी 1400 हे पाहता  200 चा आकडा अन्यायकारक आहे. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनीही आमची मागणी सरकार पुढे मांडली आहे. जर का सरकारने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही, ठोस भूमिका घेत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण करू. जो पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत सर्व राजकीय नेत्यांचे ताफे अडवले जातील. काळे झेंडे दाखवण्यात येतील.

हेही वाचा 

 

Back to top button