भाडेकरारासाठी 2.0 प्रणाली ; दिवाळीनंतर राज्यभरात होणार लागू | पुढारी

भाडेकरारासाठी 2.0 प्रणाली ; दिवाळीनंतर राज्यभरात होणार लागू

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात दरवर्षी दहा लाखांपेक्षा जास्त ऑनलाइन भाडेकरार नोंद होतात. भाडेकरू नियंत्रण कायदा 1999 च्या कलम 55 नुसार ऑनलाइन भाडेकराराच्या दस्ताची नोंदणी करणे बंधनकारक आहे. परंतु, भाडेकरार नोंदविण्याची 1.9 ही प्रणाली सध्या कार्यरत असून ती जुनी झाल्याने सातत्याने तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने लिव्ह अ‍ॅण्ड लायसन्स 2.0 ही प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणाली राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राने (नॅशनल इन्फॉरमेटिक्स सेंटर – एनआयसी) तयार केली आहे. या प्रणाली अंतर्गत भाडेकरार नोंदविल्यानंतर त्याची माहिती क्राईम अ‍ॅण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क आणि सिस्टीम्स (सीसीटीएनएस) या पोलिसांच्या संगणक प्रणालीत आपोआप माहिती मिळणार आहे. त्यामुळे भाडेकराराची प्रत प्रत्यक्ष पोलिस ठाण्यात नेऊन देण्याची गरज नाही. ही प्रणाली संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. वापरकर्त्यांचा अभिप्राय जाणून घेण्यासाठी 18 ते 28 ऑक्टोबर या कालावधीत नागरिकांना अभिप्राय नोंदविता येणार आहे. या प्रणालीचा नागरिकांनी वापर करून त्यांचा अभिप्राय ई-मेलवर पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सध्या ही प्रणाली केवळ अभिप्राय जाणून घेण्याकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रणालीवर दस्त नोंदणी होणार नाही. ही प्रणाली दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने राज्यात लागू करण्यात येणार आहे. तूर्त ऑनलाइन भाडेकराराचे दस्त नोंदविण्यासाठी लिव्ह अ‍ॅण्ड लायसन्स 1.9 हीच प्रणाली सुरू राहणार आहे, अशी माहिती नोंदणी उपमहानिरीक्षक (संगणक) अभिषेक देशमुख
यांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button