कुणबी–मराठ्यांच्या अस्सल नोंदीचे ब्रिटिशकालीन पुरावे मिळाले, लेखक विश्वास पाटील यांची माहिती | पुढारी

कुणबी–मराठ्यांच्या अस्सल नोंदीचे ब्रिटिशकालीन पुरावे मिळाले, लेखक विश्वास पाटील यांची माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असतानाच आता लेखक विश्वास पाटील यांनी जातवार जनगणनेचे पुरावे उपलब्ध असल्याचा दावा केला आहे. त्यांनी याबाबत एक ट्वीट केले आहे. ट्वीटमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टॅग करत त्यांनी कुणबी-मराठ्यांच्या ब्रिटिश-इंडिया काळातील अस्सल नोदींचे पुरावे असल्याचा दावा केला आहे. विश्वास पाटील यांनी जिल्हावार जातींच्या लोकांच्या संख्या दिली आहे.

या पोस्टमध्ये विश्वास पाटील लिहितात, “संपूर्ण महाराष्ट्रभरच्या लाखो कुणबी–मराठ्यांच्या अस्सल नोंदी, ब्रिटिश–इंडिया काळात झालेल्या शास्त्रशुद्ध, जातवार जनगणनेनुसार उपलब्ध ! मी महाराष्ट्राच्या सर्व जाती व धर्मांच्या नागरिकां समोर अत्यंत नम्रपणे असे सादर करू इच्छितो की, 1881 च्या दरम्यान संपूर्ण हिंदुस्तानमध्ये ब्रिटिश इंडिया सरकारने एक सर्व जातीधर्म समावेशक अशी जनगणना केलेली आहे. जिच्यामध्ये सर्वच जातींच्या व धर्मांच्या तसेच पोट जातींच्या नागरिकांच्या बारीक सारीक अशा स्पष्ट नोंदी आहेत.

महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात झालेल्या नोंदीमध्य एकटे कुणबी_मराठा नव्हे तर सोनार ,सुतार ,धनगर , हेटकरी , ब्राह्मणांच्या विविध पोटजाती, मुसलमान, ज्यू अशा सर्वांचा पूर्णत: शास्त्रीय पायावर व कोणताही भेदाभेद न करता सखोल सर्वे करून ब्रिटिश सरकारने नोंदी करून ठेवल्या आहेत. शिवाय पैकी, किती स्त्रिया व किती पुरुष, तसेच किती विवाहित आणि किती अविवाहित असा खूप शास्त्रशुद्ध सखोल अभ्यास करून निश्चित अनुमाने सुद्धा काढण्यात आलेली आहेत.

गेली काही महिने मी महाराष्ट्रभर, तसेच #दिल्ली, #विजापूर, #हैदराबाद इत्यादी ठिकाणच्या अनेक दप्तर खान्याना , ग्रंथालयांना, शासकीय कार्यालयांना भेटी देऊन, फिरून, कागदपत्रे टॅली करून या विषयाचा सखोल अभ्यास केला आहे. माझी निरीक्षणे खालील प्रमाणे– माननीय #मुख्यमंत्री शिंदे साहेब जन्म पावलेल्या #सातारा जिल्ह्यामध्येच (ज्यामध्ये ब्रिटिश काळात #सांगली जिल्हा समाविष्ट होता.) त्या वेळेचे फलटण, #मिरज व सांगली असे संस्थानी तालुके वगळूनही त्या जिल्ह्यामध्ये पाच लाख 83 हजार 569 एवढ्या इसमांची नोंद कुणबी म्हणून वरील जनगणने वेळी झालेली आहे.

महाराष्ट्रभरातील एकाच जिल्ह्याच्या रेकॉर्डमध्ये नव्हे तर अनेक ठिकाणी कुणबी म्हणजेच मराठा समाज ,जो शेती व पशुपालनावर जगतो, they are professional peasants अशा स्पष्ट नोंदी ब्रिटिश सरकारने अनेकदा नोंदवलेल्या आहेत. मी खाली जिल्हावार सादर करत असलेल्या नोंदी ह्या कुणबी- मराठा समाजाच्या ब्रिटिशांनी केलेल्या त्या जनगणनेच्या रेकॉर्ड वरील आहेत.

सातारा (आताच्या सांगली जिल्ह्यासह, तीन संस्थानी तालुके वगळून)—583,569 कुणबी पैकी 293748 स्त्रिया आणि289,821 पुरुष
#रत्नागिरी (आजच्या सिंधुदुर्गासह)–203,406 पैकी पुरुष 97,467 आणि स्त्रिया 105,939

#नाशिक–एकूण कुणबी 205,099 पैकी पुरुष 104,057 आणि स्त्रिया 101,042

#सोलापूर 284,267 पैकी पुरुष 185,273 आणि स्त्रिया 148,994

#ठाणे (जव्हार संस्थान सोडून)–सर्वात कमी कुणबी गणसंख्या आढळणारा जिल्हा 15,367 पैकी पुरुष 7828 आणि स्त्रिया 7539

#कोल्हापूर–299,871 पैकी पुरुष 152,113 आणि स्त्रिया 147,758

#अहमदनगर–304,000 पैकी पुरुष153,963 आणि स्त्रिया 150,847

#औरंगाबाद (जालन्यासह) 288,825 पैकी पुरुष 147,542 आणि स्त्रिया 141,283

#नागपूर जिल्हा–152000 ही संख्या कुणब्यांची असल्याची स्पष्ट नोंद असून मराठ्यांची वेगळी संख्या11000 अशी देण्यात आली आहे.

#भंडारा–79000

#चंद्रपूर–95000,(तीनशे गावातील कुणबी मालगुजारी,,)

#बेळगाव- (बॉम्बे प्रेसिडेन्सी) एकूण कुणबी 42,650. याशिवाय बेळगाव जिल्ह्यातील मराठ्यांची वेगळी संख्या साधारण एक लाख देण्यात आली आहे.

कुलाबा (#रायगड)–159,336 पैकी ,79349 पुरुष आणि स्त्रिया, 79987

#पुणे–एकूण कुणब्यांच्या नोंदी चार लाख. (1881 नुसार पुणे जिल्ह्याची लोकसंख्या 900,621 होती. पैकी हिंदू 846,781 त्यामध्ये कुणबी चार लाख . तसेच तेव्हा पुणे जिल्ह्यात 42000 मुसलमान, 619 ज्यू, 78 चिनी व 80 शीख नागरिक राहत होते.)

तसेच कुणब्यांचे पोशाख, त्यांच्या चालीरीती, व्यवसाय, लग्नाच्या पद्धती, मृत्यूनंतरचे दहनाचे विधी अशी पुणे जिल्ह्याच्या संदर्भातील खुलासेवार माहिती ब्रिटिश गॅझेटियर मध्ये पान क्रमांक, 284 ते पान क्रमांक 309 म्हणजे 25 भर पानात देण्यात आलेली आहे. अशीच अनेक पाने भरून कुणबी वर्गाची माहिती बेळगाव ,सातारा, कुलाबा अशा अनेक जिल्ह्यांच्या संदर्भात पंधरा पंधरा ते वीस वीस पानांमध्ये देण्यात आलेली आहे. त्यावरून #मराठा कुणबी समाज ही कवी कल्पना नसून ते धगधगते वास्तव आहे, हे कोणाच्याही लक्षात येईल.
मला उपलब्ध झालेल्या ब्रिटिशकालीन जिल्ह्यांच्या अस्सल कागदपत्रावरून वरील संख्या मी दिलेली आहे.

धोरण राबवणाऱ्या शासनकर्त्यांनी तसेच अभ्यासकांनी #मुंबई तसेच #दिल्ली व इतर ठिकाणी उपलब्ध असलेले ब्रिटिशांच्या सर्व जातीधर्म समावेशक जनगणनेचे मूळ रेकॉर्ड जरूर पाहावे. त्यातील बोलके आकडे लक्षात घ्यावेत.

सध्या महाराष्ट्रात स्वातंत्र्यानंतर फक्त काही शंभर ते सव्वाशे मराठा कुटुंबे अतिश्रीमंत झाली. सर्व राजकीय पक्षातील अशा मातब्बर कुटुंबांचाच मंत्रालयापासून तालुक्यापर्यंतच्या वावर इतर समाज घटकांच्या डोळ्यात भरतो. त्या मूठभरांच्या सरंजामी राहणीवरून संपूर्ण मराठा समाज खूप सुस्थितीत असल्याचा दुर्दैवाने सर्वांचाच गैरसमज झालेला आहे.

या उलट कोट्यावधी कुणबी मराठ्यांची अवस्था आज कंगाल आहे. डोंगररानात फिरणाऱ्या बेवारस व अर्धउपाशी शेळ्या मेंढ्याप्रमाणे या समाजातील तरुणांची खूपच बिकट अवस्था बनलेली आहे. ती पाहताना कोणाच्याही डोळ्यात पाणी उभे राहील.

त्यामुळेच ब्रिटिश काळापासून उपलब्ध असलेल्या कागदपत्रांचा वस्तुस्थितीच्या आधारावर विचार होऊन खऱ्या अर्थी वंचित अशा महाराष्ट्रातील मराठा शेतकरीवर्गाला न्याय मिळणे आवश्यक आहे असे मला वाटते.

ब्रिटिशांनी नीरक्षिर वृत्तीने सर्वच जाती धर्माच्या गणसंख्येची आकडेवार, गाववार नोंदी घेऊन इतका सखोल अभ्यास केला आहे की, अशी जनगणना आजच्या कॉम्प्युटर युगामध्ये सुद्धा होणे कठीण वाटते.

वरील जनगणनेमध्ये एखादा इसम त्याच्या गावात जन्मला की बाहेर गावी जन्मला, त्याचे वय जसे की तो तरुण आहे की वृद्ध आहे, इतका बारीक-सारीक अभ्यास या वेळी ब्रिटिशांनी केलेला आहे. कोणत्याही अभ्यासकास व न्याय यंत्रणेस हा direct evidence डोळ्याआड करणे कठीण होणार आहे.

संबंधित सत्य आकडे लक्षात घेऊन, विवेकाची ही लढाई शास्त्रशुद्ध पातळीवरच पार पाडली जावी, असे मला वाटते.

—#विश्वास_पाटील मुंबई.

हेही वाचलंत का?

Back to top button