मोदींनीच केले होते शरद पवारांचे कौतुक, आता अजित पवार गप्प का? अनिल देशमुख यांचा सवाल | पुढारी

मोदींनीच केले होते शरद पवारांचे कौतुक, आता अजित पवार गप्प का? अनिल देशमुख यांचा सवाल

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : शिर्डी दौऱ्यात जाहीर सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. कृषी मंत्री म्हणून शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काहीही केले नसल्याचा आरोप मोदींनी केला होता. या टीकेला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

‘शरद पवार शेतकऱ्यांचे देवदूत’

देशमुख म्हणाले की, 2011 मध्ये सुरेंद्र भोंगळे यांनी नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली. त्यात शरद पवार यांचे प्रत्येक पाऊल शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या विकासाच्या दिशेने असल्याचा उल्लेख केला होता. पवार यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या संघर्षाची मला जाणीव असून आधारभूत किमतीत शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला. ते शेतकऱ्यांचे देवदूत आहेत, असा उल्लेख मोदींनी केला होता. पण आता निवडणूक समोर आल्याने मोदींनी आपली भूमिका बदलली आहे. भारत देश अन्न धान्यामध्ये स्वयंपूर्ण शरद पवारांच्या निर्णयाने झाला. आजवरची सर्वात मोठी 71 हजार कोटींची कर्जमाफी शरद पवारांच्या निर्णयाने मिळाली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आपल्या वक्तव्यात सुधारणा करावी,’ अशी मागणीही त्यांनी केली.

‘अजित पवारांनी मंचावरून उठून जायला हवे होते’

‘खरेतर अजित पवारांनी नरेंद्र मोदी जेव्हा शरद पवार यांच्यावर टीका करत होते, तेव्हा मंचावरून उठून जायला हवे होत किंवा त्यांना माहिती देऊन सुधारणा करायला हवी होती. अजित पवारांनी माहिती दिली असती तर निश्चितच मोदींनी चूक दुरुस्ती केली असती. अजित पवारांनी आताही मोदींना माहिती दिली, तर पुढील सभेत मोदी शरद पवारांवर अशी टीका करणार नाहीत’, असा सल्लाही देशमुख यांनी दिला.

ललित पाटील प्रकरणी गृहमंत्री फडणवीस यांच्यावर टीका

ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी 17 लोकांना अटक केली आहे. मात्र, अटक करायला इतका वेळ का लागतो आहे? माजी गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना माझा सवाल आहे की, 9 महिने तो रुग्णालयात ऍडमिट होता. याची माहिती फडणवीसांना नव्हती का? यासंदर्भात वरून कोणाचा आदेश ससूनच्या डीनला आला होता? असा सवाल अनिल देशमुख यांनी उपस्थित केला.

Back to top button