कल्याणात पारंपरिक संस्कृती जपत रावण दहनाचा सोहळा: ऋतू संकुलातील रहिवाशांचा पुढाकार | पुढारी

कल्याणात पारंपरिक संस्कृती जपत रावण दहनाचा सोहळा: ऋतू संकुलातील रहिवाशांचा पुढाकार

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : ढोल-ताशांचा गजर त्याला सुमधुर टाळाची साथ आणि सोबतीला जय श्रीरामचा गगनभेदी जयघोष, अशा भारावलेल्या वातावरणामध्ये कल्याणात रावण दहनाचा सोहळा संपन्न झाला. कल्याण पश्चिमेकडे असलेल्या ऋतू गृहसंकुलातील रहिवाशांच्या पुढाकाराने आपली परंपरा आणि संस्कृती जपत हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला.

विजया दशमी अर्थातच दसरा, सत्याचा असत्यावर, तसेच सत् प्रवृत्तींनी अपप्रवृत्तींवर मिळवलेला विजय म्हणून या दिवसाला आपल्या संस्कृतीत अनन्य साधारण महत्व आहे. या पार्श्वभूमीवर ऋतू गृहसंकुलातील रहिवाशांतर्फे नेटक्या पारंपारीक पद्धतीने मंगळवारी सायंकाळी हा सोहळा साजरा करण्यात आला. यंदाच्या सोहळ्याचे हे तिसरे वर्ष होते. प्रभू श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण आणि हनुमानाच्या मनमोहक वेषात दाखल झालेल्या चिमुरड्यांच्या मिरवणुकीने या सोहळ्याला प्रारंभ झाला. त्यासोबतच दांडपट्टा, लाठी-काठीचे प्रात्यक्षिक आणि त्यानंतर ऋतू संकुलातील महिलांनी पारंपारिक वेषात विठ्ठल…विठ्ठल…गाण्यावर सादर केलेल्या टाळ नृत्याने उपस्थित साऱ्यांची मने जिंकली.

या कार्यक्रमादरम्यान युवा शिल्पकार सिद्धार्थ साठे आणि लष्करातील निवृत्त कॅप्टन विवेक घाडगे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच युवा पिढीकडून आपली संस्कृती आणि परंपरेचे जतन केले जात असल्याबद्दल शिक्षण अभ्यासक बिपिन पोटे यांनी आयोजकांचे कौतुक केले.

भाजपाचे कल्याण पश्चिम विधानसभा प्रमुख तथा माजी आमदार नरेंद्र पवार, शिक्षण अभ्यासक आणि शिक्षण तज्ज्ञ बिपिन पोटे, डॉ. पराग मिसाळ, कल्याण पश्चिमच्या भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष सौरभ गणात्रा, मधुकर फडके, आदी मान्यवरांच्या हस्ते रावण दहनाचा सोहळा संपन्न झाला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऋतू संकुलातील सोनाली बोबडे, मानसी जोशी-मेंडकी, अनिरुध्द मेंडकी,
संदीप बोबडे यांच्यासह जितेंद्र मुरांजन, साहिल महाजन, विलास आव्हाड, पंकज आणेकर, अमित जोशी, आनंद देशपांडे, अन्वेश जोशी, आदींनी विशेष मेहनत घेतली.

हेही वाचा 

Back to top button