ठाणे : धूळ-मातीच्या प्रादुर्भावमुळे श्वसनाच्या आजारांत वाढ; कल्याण-डोंबिवलीकरांच्या तक्रारींची केडीएमसीकडून गंभीर दखल

ठाणे : धूळ-मातीच्या प्रादुर्भावमुळे श्वसनाच्या आजारांत वाढ; कल्याण-डोंबिवलीकरांच्या तक्रारींची केडीएमसीकडून गंभीर दखल

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : रस्त्यावरील धूळ आणि मातीच्या प्रादुर्भावामुळे श्वसनाच्या आजारात वाढ झाली आहे. खडीवरून दुचाक्या घसरून अपघात होण्याच्या घटना वाढल्या आहेत. कल्याण-डोंबिवलीकरांच्या तक्रारींची आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी गंभीर दखल घेतली आहे. निराकरण करण्यासाठी आयुक्तांनी फर्मान काढून प्रशासनातील तांत्रिक यंत्रणा कामाला लावली आहे.

आयुक्तांनी दिलेल्या कडक इशाऱ्यानंतर कल्याण-डोंबिवलीच्या रस्त्यांवरील धूळदाण संपविण्यासाठी दोन अत्याधुनिक वाहनांचा वापर सुरू करण्यात आला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांवर वाहनांच्या वर्दळीमुळे उडणारी धूळ काढण्यासाठी केडीएमसीच्या ताफ्यात दाखल झालेली धूळक्षमन वाहने त्यांच्या क्षमतेने काम करू लागली आहेत.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्रातील रेल्वे स्थानक परिसर, 90 फुटी रोड, आग्रा रोड, घरडा सर्कलसह अन्य वर्दळीच्या ठिकाणी, तसेच अंतर्गत रस्त्यांवर माती, खडी व धुळीचे प्रमाण जास्त असल्याचे पाहणी दौऱ्यादरम्यान आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या निदर्शनास आले. नागरिकांसह शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना श्वसनाचे विकार जाणवत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. याची तत्काळ दखल घेऊन आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी यावर त्वरित उपाययोजना करण्यासाठी महापालिका क्षेत्रातील वर्दळीच्या ठिकाणी तसेच अंतर्गत रस्त्यांवर पाहणी करून तेथील साफसफाईचे, तसेच स्वच्छतेचे नियोजन समन्वयाने करण्याच्या आणि करावयाच्या कार्यवाहीचा रस्तेनिहाय कृती आराखडा त्वरित सादर करण्याबाबतचे आदेश घनकचरा व्यवस्थापन व पर्यावरण विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांना दिले आहेत.

त्याचप्रमाणे जमीन मालक आणि विकासकांच्या मोकळ्या व खासगी जागांवर मोठ्या प्रमाणात कचरा पडत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे संबंधितांशी संपर्क साधून सदर कचरा उचलून घेण्याच्या त्यांना सूचना द्याव्यात. दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यास संबंधितांवर घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी निर्गमित केले आहेत.

महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणांपासून मालवाहू वाहनातून रस्त्यावर खडी, माती पडल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. दुचाक्या घसरून अपघात होण्याच्या शक्याता असल्याने यावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार संबंधितांवर दंडात्मक कार्यवाही संबंधित विभागाने करावी. शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी त्यांच्या अधिनस्त विभागामार्फत सुरू असलेल्या स्थापत्य कामकाजाच्या ठिकाणी रस्त्यालगत निर्माण होणारा राडारोडा तात्काळ उचलून घेण्याच्या संबंधित अभियंता व ठेकेदारांना निर्देश द्यावेत, असेही आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांडगे यांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news