ठाणे : दसऱ्याच्या मेळाव्यांसाठी डोंबिवलीत बॅनरवॉर

ठाणे : दसऱ्याच्या मेळाव्यांसाठी डोंबिवलीत बॅनरवॉर

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेत उभी फूट पडून झालेल्या सत्तासंघर्षानंतर ठाकरे पक्ष आणि शिंदे गट यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच दसरा मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेनेचा शिंदे गट आणि ठाकरे गटाने आपापले शक्तीप्रदर्शन चव्हाट्यावर मांडले आहे. डोंबिवलीमध्ये तर एकच चौकात आजूबाजूला बॅनरबाजी करत दोन्ही गटाने आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या बॅनर्सवर छापण्यात आलेल्या छब्या पाहून दोन्ही शिवसेनांतील शक्तिशाली नेता कोण ? शिंदे की ठाकरे ? असा परखड सवाल बॅनर वाचक डोंबिवलीकरांकडून उपस्थीत करण्यात येत आहे.

शिंदे गटाने शिवसेनेचे एकच तत्व साहेबांचे हिंदुत्व साहेबांचे शिष्यत्व, शिवसेना ह्या शब्दासाठी अभिमानी हिंदुत्वासाठी अशा आशयाचे बॅनर चौकांत लागलेले पहायला मिळाले. याला तोड म्हणून ठाकरे गटाने देखील रातोरात याच बॅनरच्या बाजूला आपला बॅनर लावला. त्यावर निष्ठावंतांचा दसरा मेळावा, धगधगत्या मशालीचा, धगधगता विचार, अशा आशयाचा मजकूर असलेले बॅनर लावले आहेत. विशेष दोन्ही गटांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत स्वतःच्या नेत्यांचे फोटो या बॅनरवर छापून शक्ती प्रकट करण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसते. अवघ्या महाराष्ट्रातील साऱ्यांच्या नजरा मुंबईतील दसऱ्याच्या मेळाव्याकडे असतात. मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेचे दोन दसरा मेळावे पार पडू लागले आहेत.
मंगळवारी सायंकाळी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. तर आझाद मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या भात्यातून रावणावर बाण सोडणार आहेत. दसरा मेळाव्यांच्या माध्यमातून शिवसेनेचे दोन्ही गट जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत. त्यासाठी शहरांच्या चौकांत बॅनरबाजीतून स्थानिक शिवसैनिकांनी आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
डोंबिवलीतील इंदिरा चौकात शिवसेनेच्या शिंदे व ठाकरे गटाकडून केलेली बॅनरबाजी साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या बॅनरवर शिंदे गटाकडून शिवसेनेचे एकच तत्व साहेबांचे हिंदुत्व साहेबांचे शिष्यत्व, शिवसेना ह्या शब्दासाठी अभिमानी हिंदुत्वासाठी, असा संदेश देण्यात आला आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाने त्याला प्रत्युत्तर म्हणून निष्ठावंतांचा दसरा मेळावा, धगधगत्या मशालीचा, धगधगता विचार, असा संदेश दिला आहे.
या बॅनरवर हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे, दिवंगत आनंद दिघे आणि त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छबी छापण्यात आली आहे. त्याच बाजूला ठाकरे गटाकडून लावलेल्या बॅनरवर देखील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे व माजी उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची छबी छापण्यात आली आहे. दोन्ही शिवसेनांचे नेते शक्तिशाली असल्याचे या बॅनर्सच्या माध्यमातून दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news