सांगली : शेगावच्या तरुणाची वैमानिक पदाला गवसणी; अभिनंदनाचा वर्षाव | पुढारी

सांगली : शेगावच्या तरुणाची वैमानिक पदाला गवसणी; अभिनंदनाचा वर्षाव

जत; पुढारी वृत्तसेवा : प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत दुष्काळी जत तालुक्यातील शेगाव येथील युवकाने वैमानिक पदाला गवसणी घातली आहे. तब्बल दोनशे तास विमान चालवत पायलटचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. याचबरोबर सलग ७ परीक्षेत यश संपादन करत जिद्द, चिकाटी कायम ठेवत पायलट होण्याचे ध्येय पूर्ण केले आहे. अक्षय महादेव व्हनमाने असे वैमानिक झालेल्या तरुणाचे नाव आहे. तालुक्यातून पहिला वैमानिक बनविण्याचा मान त्याने मिळविला आहे. अक्षयच्या या यशाने जिल्हाची मान उंचावली आहे.

संबधित बातम्या 

अक्षयने वैमानिकचे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी कमर्शियल पायलट लायसन्स हे प्रशिक्षण अकादमी ऑफ कारवर इव्हेशन बारामती या संस्थेअंतर्गत पूर्ण केले आहे. यासाठी दिल्ली, चेन्नई, मुंबई, हैदराबाद, कोलकत्ता येथे परीक्षा दिल्या. दुष्काळी तालुक्यातील ग्रामीण भागातून अक्षयने पाहिल्याच प्रयत्नात यशापर्यंत मजल मारली आहे.

अक्षयने आपल्या शिक्षणाची सुरुवात ग्रामीण भागातील श्री. विजयसिंह डफळे हायस्कूल शेगाव येथून सुरू केली. नंतर एस .आर. व्ही. एम हायस्कूल येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. एस.पी कॉलेज पुणे येथून पदवीचे शिक्षण पूर्ण केले .कमर्शियल पायलटसाठी इंग्रजी भाषेवर चांगल्या प्रभुत्वाची आवश्यकता होती. ती गरज अक्षयने यशस्वीपणे अत्यंत कष्टप्रद परिस्थितीतून पूर्ण केली. अक्षयला या यशासाठी संजय व्हनमाने यांनी प्रेरणा लाभली. शहाजी माने, वडील महादेव व्हनमाने, आई आशा, बहीण तेजश्री माने, भाऊ सागर व्हनमाने, श्रेया माने यांचे मार्गदर्शन लाभले.

या निवडीनंतर माजी कॅबिनेट मंत्री आमदार महादेव जानकर, आमदार गोपीचंद पडळकर, शिवसेनेचे संपर्कप्रमुख योगेश जानकर, माजी सरपंच लक्ष्‍मणराव बोराडे, माजी जिल्हा परिषद सदस्या कांचन बोराडे, रासप नेते अजित पाटील, उपसरपंच अविनाश सावंत, हरीचंद्र शिंदे, चंद्रकांत गायकवाड यांनी अभिनंदन केले. यानंतर अक्षयवर तालुक्यातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे. ( वैमानिक पदाला गवसणी )

हेही वाचा : 

माझे नुकतेच वैमानिकचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. या परीक्षेनंतर टाईप रेटिंग या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी संधी भेटणार आहे. वैमानिक बनण्याचे आव्हान जिद्दीने व कष्टाने पूर्ण केले आहे. दुष्काळी भागातील तरुणांनी अशा संधी शोधल्या पाहिजेत. त्यामध्ये करिअर केले पाहिजे. या क्षेत्रात संधी कमी प्रमाणात असते. स्पर्धा असल्याने सातत्य ठेवावे लागते.
-अक्षय महादेव व्हनमाने ( रा. शेगाव )

Back to top button