वर्धा : वन्यप्राण्याचे मांस शिजवून पार्टी करणाऱ्या दोघांना अटक; वनविभागाची सावंगी परिसरात कारवाई | पुढारी

वर्धा : वन्यप्राण्याचे मांस शिजवून पार्टी करणाऱ्या दोघांना अटक; वनविभागाची सावंगी परिसरात कारवाई

वर्धा; पुढारी वृत्तसेवा : वन्यप्राण्याचे मांस हॉटेलमध्ये शिजवून सुरू असलेल्या पार्टीचे बिंग फुटले आणि वनविभागाने कारवाई केली. या प्रकरणी दोघांना वर्धा वनविभागाच्या चमुने अटक केली. ते मास चितळचे असल्याची प्राथमिक माहिती आहे.
शहरालगतच्या सांवगी टी पॉईट भागात ठाकरे किचन नामक रेस्टॉरंट येथे वन्यप्राण्याचे मांस शिजवून काही लोकांनी पार्टी केली असल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली. त्यावरून वनविभागाच्या चमूने छापा घालून संबंधित हॉटेलची तपासणी केली. त्यावेळी फ्रिजमधुन काही मांस जप्त करण्यात आले. हे मांस वन्यप्राणी चितळचे असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली. याप्रकरणी वनविभागाच्या वतीन गुन्हा नोंद करण्यात आला. प्रभाकर चोंदे व सुमीत मून या दोघांना अटक करण्यात आली आहे. सदर आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसाची वन कोठडी सुनावली. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी रूपेश खेडकर, सहाय्यक वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश कावळे, प्रशांत कनेरी, माधव माने, सयाम आदींनी केली. सदर गुन्ह्यात सहभागी असलेल्या अन्य आरोपींचा शोध वनविभागाकडून सुरु आहे.

Back to top button