ठाणे : सफाई कामगारांचा चार महिन्यांचा पगार थकला; कुटुंबांवर उपासमारीची वेळ | पुढारी

ठाणे : सफाई कामगारांचा चार महिन्यांचा पगार थकला; कुटुंबांवर उपासमारीची वेळ

सापाड, पुढारी वृत्तसेवा :  शहर स्वच्छ ठेवण्याची महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सफाई कामगारांचा तब्बल चार महिन्यापासून पगार झालेला नाही. पगारापासून वंचित असल्यामुळे त्यांच्या परिवारावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा कचरा उचलणाऱ्या शेकडो सफाई कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून पगारापासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीचे संकट ओढवले असून मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. पालिका प्रशासनाकडून लवकरात लवकर वेतन मिळावे, अन्यथा काम बंदचा इशारा सफाई कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला आहे.
वेतनासंदर्भात ठेकेदाराकडून सफाई कर्मचाऱ्यांना फक्त आश्वासन देण्यात येत आहे. ठेकेदारांच्या या वेळकाढू भूमिकेमुळे सफाई कर्मचाऱ्यांच्या मनात तीव्र संताप निर्माण झाला आहे. घनकचऱ्यावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न सुविधांअभावी नेहमीच चर्चेचा विषय बनला आहे. आपले स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी रात्रंदिवस धडपड करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांवर संक्रांत आली आहे.

कचरा उचलण्यासाठी महापालिकेकडून ठेके दिले गेले आहेत. त्यानुसार महापालिका ठेकेदाराला पैसे अदा करत असते. ऑगस्ट पर्यंतचे पेमेंट ठेकेदाराला पोहचले आहे. नोव्हेंबर महिन्याचे पेमेंट महापालिकेकडून बाकी आहे. जर ठेकेदार कर्मचाऱ्यांना नियमित पगार देत नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. आणि त्याचे ठेके काढून घेतले जातील.

– अतुल पाटील, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन

सफाई कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत अनेक वेळेस पालिकेचे घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त अतुल पाटील यांची भेट घेतली. पगारासंदर्भात चर्चा केली. कर्मचाऱ्यांची परिस्थिती समजावून सांगितली. तरी देखील पालिका प्रशासन पगार न देऊन त्यांची मस्करी करणार असेल तर ते यापुढे घडू देणार नाही. कर्मचाऱ्यांना त्यांचे हक्क मिळवून देणार!

– उल्हास भोईर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते

हेही वाचलंत का?

Back to top button