Navaratri 2023 : गोव्यातील जागृत देवस्थान श्री शांतादुर्गा कुंकळकरीण, श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण | पुढारी

Navaratri 2023 : गोव्यातील जागृत देवस्थान श्री शांतादुर्गा कुंकळकरीण, श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण

मडगाव

विशाल नाईक

गोव्यात कित्येक प्रसिद्ध देवस्थाने आहेत. ज्यांची ख्याती देशविदेशापर्यत पसरलेली आहे. अशा प्रसिद्ध देवस्थानांपैकी एक आहे सासष्टी तालुक्याच्या कुंकळ्ळी गावाची जागृत देवी श्री शांतादुर्गा कुंकळकरीण आणि तिला लागून असलेल्या केपे तालुक्याच्या फातर्पा गावातील श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण.

या दोन्ही देवस्थानांची स्वतःची अशी वेगळी खासियत आहे. नवसाला पावणार्‍या देवी म्हणून त्यांना ओळ्खले जाते. म्हणून जत्रा असो किंवा छत्रोत्सव भाविकांची अलोट गर्दी होते. अगदी महाराष्ट्राच्या संभाजीनगर वरून साडेबारा तासांचा प्रवास करून भाविक कुंकळ्ळी आणि फातर्पा येथे येतात.

या दोन्ही देवस्थानांचे स्वतःचे असे वेगळे वैशिष्ट्य आहे. श्री शांतादुर्गा हे जरी त्यांचे समान नाव असले तरीही त्यांचा इतिहास मात्र वेगळा आहे. श्री शांतादुर्गा कुंकळीकरीण देवीचे कुंकळ्ळीतील कुलवाडा गावाच्या तळेभाट येथे मुख्य मंदिर होते. तिला चार बहिणी आहेत. गोव्यात ज्यावेळी पोर्तुगीजांनी बाटवाबाटवी सुरू केली त्यावेळी देवी फातर्पा येथे जाऊन राहिली. समस्त कुंकळ्ळीच्या नागरिकांची श्री शांतादुर्गा देवी आराध्य दैवत आहेच.

विशेष म्हणजे सासष्टीतील ख्रिस्ती बांधवही शांतादुर्गा देवीला नवसाची देवी म्हणून मानतात. प्रत्येक वर्षी पौष शुद्ध नवमीच्या महिन्यांत पाच दिवस देवीची अखंड जत्रा भरते. गोव्यातील सर्वांत मोठा जत्रोत्सव म्हणून त्याची ख्याती आहे. कुंकळीकरिणीची आख्यायिका अशीही आहे की, देवी दरवर्षी आपल्या कुळवाडा या मूळ गावी येते म्हणून कुंकळीकर तो आनंद साजरा करण्यासाठी छत्रोत्सव साजरा केला जातो. यावेळी देवीला गुलाल लावला जातो आणि पालखी सजवली जाते. देवी आपल्या गावी येते म्हणून ती फार आनंदात असते. म्हणून पालखीचे वजन फार कमी असते पण जेव्हा देवीची पालखी पुन्हा कुंकळ्ळीत जाते त्यावेळी पालखी फार भारी होते. गोव्यात सर्वात प्रभावी देवी म्हणून अशी श्री कुंकळीकरीण देवीची ओळख आहे.

आख्यायिका –

श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण देवीचेसुद्धा वेगळे महात्म्य आहे. एका आख्यायिकेप्रमाणे शिव आणि विष्णू यांचे एकदा युद्ध झाले. हे युद्ध थांबत नसल्याचे पाहून ब्रम्हदेवाने श्री देवी दुर्गा हिला बोलावणे पाठवले. ते निमंत्रण मान्य करून श्री देवी दुर्गाने दोघांमधील युद्ध शांत केले. म्हणून तिला श्री शांतादुर्गा असे नाव पडले. कुंकळ्ळीत धर्मांतरण होत होते. म्हणून लोकांनी देवीचे देऊळ फातर्पा येथे आणले.

कसे जाल? 

या दोन्ही मंदिरांना भेट द्यायची असल्यास सर्वांत प्रथम दक्षिण गोव्याचा मध्यभाग म्हणून ओळखल्या जाणार्‍या मडगाव येथे यावे लागते. मडगाववरुन सोळा किलोमीटर अंतरावर ही प्रसिद्ध मंदिरे वसलेली आहेत. मडगाववरुन बाळ्ळी आणि तेथून देवस्थान असा हा रस्ता आहे. स्वतःचे वाहन असल्यास पर्यटक चिंचोणे आणि बेतुलमार्गे काब दि राम किल्ला पाहून मंदिराकडे पोहोचू शकतात. देवस्थानापर्यंत प्रवासी बसेससुद्धा जातात.

Back to top button