Supriya Sule : मुंडे, महाजनांच्या मुलींचे भाजपकडून हाल : खासदार सुप्रिया सुळे | पुढारी

Supriya Sule : मुंडे, महाजनांच्या मुलींचे भाजपकडून हाल : खासदार सुप्रिया सुळे

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा :  स्व.गोपीनाथ मुंडे व स्व.प्रमोद महाजन यांनी भारतीय जनता पक्ष वाढविण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले. मात्र, त्या दिग्गज नेत्यांच्या दोघी मुलींचे या पक्षाकडून सध्या हाल केले जात असून, त्यांना राजकारणाच्या प्रवाहातून बाजूला फेकण्याचे काम भाजप करत आहे. भाजपाने त्यांना न्याय द्यावा, अन्यथा मोठी बहीण म्हणून मी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहील. पंकजा मुंडे यांनी ऊसतोड मजुरांसाठी पुकारलेल्या संपात आम्ही निश्चित मदत करू, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. पाथर्डी शहरातील संस्कार भवन येथे खा.सुळे यांनी सोमवारी (दि.9) महिला व जनतेशी मुक्त संवाद साधला.

संबंधित बातम्या :

त्यावेळी त्या बोलत होत्या. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, आमदार प्राजक्त तनपुरे, अ‍ॅड. प्रताप ढाकणे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, संदीप वर्पे, ऋषिकेश ढाकणे, चंद्रकांत म्हस्के, माधव काटे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष योगिता राजळे, माजी जिल्हा परिषद सदस्या उज्ज्वला शिरसाट, सविता भापकर, मनिषा ढाकणे, रत्नमाला उदमले, कल्याण नेमाने, रामराव चव्हाण, राजेंद्र खेडकर, देवा पवार, राहुल गवळी, महेबुब शेख, भारती असलकर, बंडू बोरूडे, भगवान दराडे, चंद्रकांत भापकर, महारुद्र किर्तने, नवनाथ चव्हाण, भाऊसाहेब धस उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी सुळे यांनी मोहटा देवीचे दर्शन घेतले.

खा. सुळे म्हणाल्या, कारवाईचा धाक दाखवित सध्या पक्ष व आमदार फोडण्याचा उद्योग सुरू असला तरी, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची कोणी स्थापना कोणी केली, हे जनतेला माहित आहे. कोणीही यावे व टपली मारून जावे, असे आता घडणार नाही. त्यांच्याकडे खोके असतील, पण माझ्याकडे शरद पवार आहेत. जीवाचे रान करून मी राष्ट्रवादी जिवंत ठेवत दिल्लीसमोर झुकणार नाही. केंद्रात व राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. सरकार आल्यावर कंत्राटी पद्धतीने नायब तहसीलदार भरण्याच्या आदेशाची होळी मंत्रालयाच्या दारात करणार आहोत. शाळा बंद करून दारूची दुकाने सुरू करणारे हे खोके सरकार जनताच उलथवून टाकणार आहे. समतेची भाषा शिक्षणातून येते. नांदेड येथील शासकीय रुग्णालयात साठ लोकांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी आरोग्य मंत्र्याचा राजीनामा घ्यायला हवा होता, असे खा. सुळे म्हणाल्या.

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष खासदार रोहणी खडसे म्हणाल्या, ज्यांनी चाळीस वर्षे खस्ता खाऊन भारतीय जनता पक्ष वाढविला, त्या एकनाथ खडसेंना पक्षाने किती त्रास दिला, आम्ही ते भोगले आहे. या सर्व त्रासापासून आम्ही बाहेरही पडलो. गोपीनाथ मुंडे यांनी भाजप तळागाळात नेला. त्यांची मुलगी पंकजा मुंडेंना किती त्रास दिला जातोय. सहन होत नाही. आम्ही तर पंकजा मुंडेंना म्हणतो ताई आता चला… ज्यांनी चाळीस वर्षे कष्ट घेतले, त्यांचा भाजपा झाला नाही, तर तुमचा तो कसा होईल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
ऋषिकेश ढाकणे यांनी स्वागत केले. प्रताप ढाकणे यांनी प्रास्ताविक केले. गणेश सरोदे यांनी सूत्रसंचालन केले. योगेश रासने यांनी आभार मानले.

घुले बंधूंची कार्यक्रमाकडे पाठ
शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात एकेकाळी प्रतिनिधित्व करणारे तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या बरोबर निष्ठेने असणारे माजी आमदार नरेंद्र घुले व चंद्रशेखर घुले, तसेच त्यांच्या समर्थकांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. त्यामुळे घुले बंधू हे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे झुकल्याचे दिसून आले.

 

Back to top button