Dhangar Reservation : आरक्षणप्रश्नी आता चौंडीतच बैठक; यशवंत सेनेने राज्य सरकारला घातली अट | पुढारी

Dhangar Reservation : आरक्षणप्रश्नी आता चौंडीतच बैठक; यशवंत सेनेने राज्य सरकारला घातली अट

जामखेड; पुढारी वृत्तसेवा : धनगर आरक्षणप्रश्नी राज्य सरकारबरोबरच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली; मात्र सरकारने मुळ मुद्याला सोईस्कर बगल दिल्याने, आता यापुढील बैठक मुंबईला न घेता, आंदोलनस्थळीच घेतली जावी अशी, अट यशवंतसेने घातली आहे.
धनगर समाजाचा अनुसूचीत जमाती प्रवर्गात समावेश व्हावा, या मागणीसाठी यशवंतसेनेतर्फे चौंडीत अण्णासाहेब रुपनवर, सूरेश बंडगर, राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे, नितीन धायगुडे, गोविंद नरुटे उपोषणास बसले आहेत. 6 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या उपोषणाचा आज 18 वा दिवस आहे.

तब्येत बिघडल्याने पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करावे लागलेले उपोषणकर्ते अण्णासाहेब रुपनवर यांनी काल अचानक ससूनमधील उपचार अर्धवट सोडून पुन्हा चौंडीत येत आपले उपोषण सलग सुरू ठेवले. तर, चौंडीत उपोषण करत असलेले सुरेश बंडगर यांनीही ऑक्सिजन मास्क काढून टाकला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राज्य सरकारबरोबर 21 सप्टेंबरला झालेली चर्चा निष्फळ ठरल्याच्या निषेदार्थ या दोन्ही उपोषणकर्त्यांनी उपचार सोडून देत आंदोलन 18 व्या दिवशीही पुढे सुरू ठेवले आहे. शनिवारी आमदार प्रा. राम शिंदे यांनी पाचव्यांदा आंदोलनस्थळी भेट दिली. तर, परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी आंदोलनस्थळी भेट देवून उपोषणकर्त्यांची विचारपूस केली. आज दिवसभरात परभणी, सोलापूर, जालना, संभाजीनगर, यवतमाळ, बुलढाणा, सातारा व पुणे येथील धनगर बांधवांनी आंदोलनस्थळी भेट दिली.

सरकारबरोबरची चर्चा चालू ठेवावी : आ. शिंदे

चौंडीतील आंदोलनाचा 18 वा दिवस असल्याने त्याचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत. येथील आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी आपण पाठपुरावा केला आहे. आंदोलकांचा निरोप सरकारने नेमलेल्या मंत्र्याकडे पोहोच करू; मात्र सरकारबरोबरची चर्चा चालू ठेवावी, असे मत आमदार प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा

‘पंचगंगेच्या हक्का’साठी पुढाकाराची गरज

मुंबई : मोरबे धरणाने गाठली १०० टक्के पाणी पातळी; धरणाचे दोन दरवाजे उघडले

नगर तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग; शेतकर्‍यांमध्ये समाधान

Back to top button