Ganeshotsav 2023 : गणेशचतुर्थीमागचा मांगल्यविचार | पुढारी

Ganeshotsav 2023 : गणेशचतुर्थीमागचा मांगल्यविचार

पं. विद्याधरशास्त्री करंदीकर

गणेश हा बुद्धिदाता आहे. 14 विद्या आणि 64 कला या गणेशउपासनेने लाभू शकतात. गणेश चतुर्थी हे एक व्रत आहे. याला वरद चतुर्थी असेही म्हटले जाते. या काळात गणपतीची जी पूजा केली जाते, ती सिद्धीविनायक किंवा पार्थिव गणेश म्हणून केली जाते. शास्त्रकारांनीही सण-व्रतवैकल्ये-उत्सव यादरम्यानच्या प्रथा-परंपरा सांगताना पर्यावरणाचा विचार केलेला आहे. कोणताही उत्सव हा मंगलदायी असावा. त्यातील मांगल्य जपणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. गणपती हा तर मंगलमूर्ती आहे. त्यामुळे त्याचा उत्सव साजरा करताना सर्वांनीच या सणाचे पावित्र्य, मांगल्य जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

भाद्रपद चतुर्थीला गणेशाचे आगमन घराघरांत होते. त्यानिमित्ताने गणेशोत्सवाचे आध्यात्मिक महत्त्व आपण समजून घ्यायला हवे. शास्त्रकारांनी कोणत्याही मंगल कार्यापूर्वी गणपतीची आराधना करावी, असे सांगितले आहे. कारण तो विघ्नहर्ता आहे. गणेश ही बुद्धीची देवता आहे. त्यामुळे प्रत्येक सर्जनशील व्यक्ती किंवा अगदी संत महात्म्यांनीही आपल्या कलेची साधना करताना, निर्मिती करताना, त्याचे आविष्करण करताना गणेशाची उपासना केली आहे. खरे पाहता शारदा ही बुद्धीची देवता आहे असे आपण म्हणतो. मग हा विरोधाभास आहे का, असा प्रश्न निर्माण होते. पण गणेशामुळे बुद्धी, ज्ञान मिळते आणि ते व्यक्त करण्यासाठी शारदेची मदत लागते.

विद्या दुसर्‍याला देण्याची कला ही शारदेमुळे मिळते. शारदा ही वाणीची देवता आहे. म्हणूनच तिला वाग्देवताही म्हणतात. गणेश हा बुद्धिदाता आहे. 14 विद्या आणि 64 कला या गणेशउपासनेने लाभू शकतात. गणेशाची उपासना करताना अथर्वशीर्षाचे पठण केले जाते. गणेशोत्सवादरम्यान अनेक ठिकाणे अथर्वशीर्षाची आवर्तने केली जातात. मुळातच संपूर्ण लिपी गणेशाच्या रूपानेच बनली आहे, असा विचारही काहींनी मांडला आहे. हे संपूर्ण जग गणेशापासूनच बनले आहे, असे त्यात म्हटले आहे. गणेश ही युद्धदेवता आहे. तो युद्धाचा प्रमुख होता. एकवीस गणांचा अधिपती हा गणपती होतो.

गणेश चतुर्थी हे एक व्रत आहे. याला वरद चतुर्थी असेही म्हटले जाते. धर्मशास्त्रातील आणि पुराणांमध्ये यासंदर्भात अनेक संदर्भ आणि माहिती आढळते. गणेश चतुर्थीसाठी आपण स्वतः आपल्या हाताने मातीचा गणपती बनवायचा, असे शास्त्रकारांनी सांगितले आहे. त्याचबरोबर माती आणून, भिजवून, मूर्ती तयार होण्यापर्यंत गणपतीच्या नावांचे निरनिराळे मंत्र सांगितले आहेत. या मंत्राचे उच्चारण करत ही मूर्ती घडवली जावी, असे अभिप्रेत आहे. तसेच या मूर्तीची मध्यान्हाला पूजा करून, नेवैद्य दाखवून त्याच दिवशी त्याचे विसर्जन करावे, असा उल्लेख पार्थिव गणेशोत्सव व्रतामध्ये आढळतो. मात्र आपला समाज उत्सवप्रिय आहे. त्यामुळे दीड दिवस, पाच दिवस गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा रूढ झाली.

श्रीगणेशाचे वाहन मूषक म्हणजे उंदीर आहे. उंदराची प्रकृती आणि शरीररचना पाहता गणपती त्यावर बसून सर्वत्र फिरेल का, अशी शंका अनेकांना येऊ शकते. परंतु काही गोष्टींना पौराणिक कथेचा आधार असतो. मूषक हे वाहन असण्यालाही पौराणिक कथेचा आधार आहे. याबाबत अनेक कथा पुराणामध्ये आहेत. वास्तविक, मोर हे देखील गणपतीचे वाहनच आहे. म्हणूनच गणरायाला मोरेश्वर, मयुरेश्वर अशी नावेही आहेत. पण गणपतीसमोर कधीही मोर हे वाहन ठेवले जात नाही. उंदीरच ठेवला जातो. त्यामागची एक कथा आहे. क्रौंच नावाचा एक गंधर्व होता आणि इंद्रसभेत उपस्थित असताना त्याचा पाय चुकून वामदेवाला लागला. त्याने त्या क्रौंचाला ‘तू उंदीर होशील’ अशा शाप दिला. हा उंदीर थेट पराशर मुनींच्या आश्रमात दाखल झाला.

तेथे त्याने जे काही खाण्यासारखे होते ते खाऊन टाकले आणि बाकी गोष्टी कुरतडून टाकल्या. या उंदरापासून सुटका मिळवण्यासाठी पराशर ऋषींनी गणेश उपासना केली. जेव्हा प्रत्यक्ष गणराय तिथे प्रकट झाले आणि त्यांनी आपल्या हातातील पाश टाकून उंदराला जेरबंद करून ठेवले. त्यानंतर गणेशाने त्या उंदराला वर मागण्यास सांगितले. तेव्हा उंदीरमामा गर्वाने आंधळे झालेले होते. त्यांनी गणेशाला उलट प्रश्न केला. तुलाच काही मागायचे असेल तर माग, असे तो म्हणाला. यावर गणपतीने मुत्सद्दीपणाने त्या उंदराकडे ‘तू आजपासून माझे वाहन हो’, असा वर मागितला. अशा रीतीने उंदीर हा गणपतीचे वाहन बनल्याची कथा आहे.

श्रीगणेशाचे रूपही शेतकर्‍यांशी जोडले गेलेले आहे. गणपतीचे कान सुपासारखे आहेत. सूप शेतकर्‍यांसाठी महत्त्वाचे असते. शेतातून काढणी केलेला भात सुपातून पाखडला जातो. त्यानंतर भाताचे फोल वार्‍यावर उडून जातात आणि आतील तांदूळ केवळ सुपात राहतो. गणपतीच्या पूजेत विविध प्रकारच्या पत्रींचा समावेश असतो. गणरायाला वाहिल्या जाणार्‍या पत्री म्हणजे आयुर्वेदिक वनौषधी आहेत. विशेषतः गणपतीला दुर्वा प्रिय आहेत. आयुर्वेदानुसार दुर्वा या अत्यंत थंड मानल्या जातात. यासंदर्भातही एक कथा आढळते.

अनलासुर नावाच्या राक्षसाने बालरूपातील गणेशाला गिळण्याचा प्रयत्न केला; परंतु गणपतीने विराट रूप धारण केले आणि अनलासुरालाच गिळंकृत केले. त्या राक्षसाचा नाश तर झाला; पण इकडे गणपतीच्या अंगाची लाही लाही होऊ लागली. तो गडबडा लोळू लागला. त्याने सर्वांगाला चंदनाचा लेप दिला. तरीही दाह काही थांबेना. तेव्हा देवांनी त्याच्या डोक्यावर चंद्राची स्थापना केली. त्यामुळे गणपतीला भालचंद्र असे नाव पडले. विष्णूने आपल्या हातातील कमळ त्याच्या हाती दिले. त्यामुळे त्यास पद्मपाणी असे नाव मिळाले. भगवान शंकराने आपल्या गळ्यातील नाग गणपतीच्या कमरेला बांधला. वरुणाने गणपतीच्या सर्वांगावर पाण्याचा अभिषेक केला. तरीही अंगाची लाही थांबेना. इतक्यात काही ऋषीमुनी तेथे आले आणि त्या प्रत्येकाने 21-21 दुर्वांची जुडी गणपतीच्या मस्तकावर ठेवली. ती ठेवल्याबरोबर तत्काळ गणपतीच्या अंगाची आग शांत झाली. त्यामुळे गणपतीला आजही दुर्वा वाहिल्या जातात.

Back to top button