वाळूच्या कणाच्या आकाराचा कॅमेरा! | पुढारी

वाळूच्या कणाच्या आकाराचा कॅमेरा!

न्यूयॉर्क : तंत्रज्ञानाच्या कक्षा आता इतक्या रुंदावल्या आहेत की, एकेकाळी जी उपकरणे हाताळण्यासाठी जड व कठीण असायची, ती आता अगदी हाताच्या बोटावर ठेवले तरी निरखून पहावी लागतात! तंत्रज्ञानातील ही उत्तुंग झेप अगदी वैद्यकीय शास्त्रासाठी देखील लाख मोलाची ठरत आली आहे. याच तंत्रज्ञानाच्या दुनियेत आता आणखी एक महत्त्वाकांक्षी पाऊल टाकले गेले असून वाळूच्या कणाच्या आकाराचा एक नवा अद्ययावत कॅमेरा प्रत्यक्षात साकारला गेला आहे.

तंत्रज्ञानाच्या या सूक्ष्मीकरणाचा विशेष लाभ अलीकडे होत आला आहे आणि आता वाळूच्या कणाच्या आकारातील कॅमेर्‍यामुळे वैद्यकीय क्षेत्रात नवी क्रांती घडू शकते. केवळ 0.575 गुणिले 0.575 इतक्या सूक्ष्म आकारातील कॅमेरा घडवला गेला असून यामुळे कितीही छोट्या जागेतून छबी टिपणे आता शक्य होणार आहे. या इमेज सेन्सरबद्दल बरीच उत्सुकता असणे साहजिकच होते आणि सोशल मीडियावर त्याचे प्रतिबिंब उमटत राहिले आहे.

अमेरिकेत स्थित ओम्नी व्हीजन टेक्नॉलॉजीने तयार केलेल्या या डिव्हाईसला ओव्ही6948 या नावाने ओळखले जाणार आहे. व्यावसायिक स्तरावर उपलब्ध असणारा सर्वात छोटा इमेज सेन्सर अशी त्याची गिनीज रेकॉर्डसमध्ये देखील नोंद झाली आहे.

ओमनी व्हीजनने बाजारपेठेतील मागणी विचारात घेत ही उत्पादननिर्मिती केली. रियुजेबल मेडिकल इमेजिंग इक्विपमेंटमधील क्रॉस कन्टेमिनेशन रिस्क व हाय मेन्टेनन्स कॉस्टमुळे जी आव्हाने होते, त्याचा बीमोड या माध्यमातून करता येणे शक्य असल्याचा होरा आहे.

ओव्हीएम6948 हा आजवरचा एकमेव अल्ट्रा स्मॉल चिप ऑन टीम कॅमेरा असून बॅकसाईड इल्युमिनेशनमुळे अव्वल दर्जाची इमेज आणि लो लाईट परफॉर्मन्स ही त्याची ठळक वैशिष्ट्ये असणार आहेत, असे ओमनी व्हीजनने यावेळी म्हटले आहे.

Back to top button