Pankaja Munde/Devendra Fadnavis : भाजप श्रेष्ठींकडून पंकजा मुंडेंना बळ, फडणवीसांबाबत नाराजी; सुषमा अंधारेंचा गौप्यस्फोट | पुढारी

Pankaja Munde/Devendra Fadnavis : भाजप श्रेष्ठींकडून पंकजा मुंडेंना बळ, फडणवीसांबाबत नाराजी; सुषमा अंधारेंचा गौप्यस्फोट

पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात निवडणूक लढवणे भाजपला परवडणार नाही, त्यांना केंद्रात पाठवा, अशी नाराजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत व्यक्त झाली. दुसरीकडे भाजपच्या वरिष्ठांकडूनच पंकजा मुंडे यांच्या यात्रेला बळ देऊन फडणवीस यांच्याविरुद्ध सक्षम नेतृत्व उभे केले जात आहे, असा गौप्यस्फोट शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शनिवारी पुण्यात केला.

संबंधित बातम्या :

डेक्कन येथील शिवसेना भवनामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अंधारे बोलत होत्या. शहरप्रमुख गजानन थरकुडे, महिला सेनेच्या पल्लवी जावळे, महेश मोगरे व निषाद पाटील उपस्थित होते. त्या म्हणाल्या, राज्यात भाजपबद्दल नकारात्मकता आहे. फडणवीसांंच्या नेतृत्वात निवडणुका जिंकू शकत नाहीत. म्हणून आरएसएसची बैठक महाराष्ट्रात झाली. छगन भुजबळ सरकारमध्ये गेल्याने ’ईडी’ला त्यांचे प्रकरण आठवत नाही. आनंदाचा शिधा, आरोग्य शिबिरे यामध्ये गोंधळ आहे. आरोग्य विभागातील घोटाळा उघडकीस आणून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पितळ उघड करणार असल्याचे अंधारे यांनी सांगितले.

नीलम गोर्‍हेंकडे एकही कार्यकर्ता नाही

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांना एकही कार्यकर्ता तयार करता आला नाही किंवा त्यांनी सेनेची एक शाखाही उघडली नाही. तरीसुद्धा उद्धव ठाकरे यांनी त्यांना 4 वेळा महत्त्वाची पदे दिली. त्यानंतरही त्यांनी शिवसेना सोडून शिंदे गटात प्रवेश केला. आता त्याच उद्धव ठाकरे यांच्यावर चिखलफेक करत आहेत. हा प्रकार शिवसैनिक खपवून घेणार नाहीत, अशा शब्दात अंधारे यांनी डॉ. गोर्‍हे यांच्यावर टीका केली.

…म्हणून शीतल म्हात्रे शिंदे गटात

बोरिवली पश्चिम येथील लक्ष्मण म्हात्रे यांना कुमार, शरयू, कीर्ती यांच्यासह आठ मुले होते. कुमार यांच्या मृत्यूनंतर त्यांची मुले अशोक व मुकेश यांनी मालमत्तेच्या वारसदार असणार्‍या त्यांच्या आत्या शरयू मोगरे व कीर्ती पाटील यांच्या परस्पर साडेनऊ हजार चौरस फुटांची मालमत्ता बळकावली. बनावट दस्त तयार करून 350 कोटी रुपयांची मालमत्ता विकसकाला विकली. मुकेश हा शीतल म्हात्रे यांचा पती असून, शीतल म्हात्रे यांनी राजकीय बळ वापरून हा आर्थिक घोटाळा दडपला. तर कारवाई टाळण्यासाठी शिंदे गटात प्रवेश केला. याबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करण्यात आली असून, चौकशी करावी, अशी मागणी अंधारे यांनी केली.

हेही वाचा

Diamond League Final : नीरज चोप्राची ‘डायमंड लीग’मध्ये रौप्य कामगिरी, अवघ्या 0.44 सेंटीमीटरने सुवर्ण पदक हुकले

कोल्हापूर : साऊंड सिस्टीमचा दणदणाट, लेसर शोचा झगमगाट अपायकारक

ओबीसी आरक्षणात नवा वाटेकरी नसेल : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Back to top button