‘स्टोक्स’ वादळात न्यूझीलंड भुईसपाट | पुढारी

‘स्टोक्स’ वादळात न्यूझीलंड भुईसपाट

लंडन : वृत्तसंस्था इंग्लंड आणि न्यूझीलंड चार सामन्यांच्या वन-डे मालिकेतील तिसर्‍या सामन्यात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने धुवाँधार फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली. वन-डे फॉर्मेटमधून निवृत्तीतून पतरलेल्या स्टोक्सने दमदार 182 धावांची स्फोटक खेळी केली.

इंग्लंडची खराब सुरुवात

या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ट्रेंट बोल्टने चेंडूने संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर जॉनी बेअरस्टोची विकेट मिळवली. यानंतर 13 धावांवर बोल्टने जो रूटच्या रूपाने इंग्लंडला दुसरा धक्का दिला.

15 चौकार आणि 9 षटकार

इंग्लंडने झटपट दोन गडी गमावल्यानंतर बेन स्टोक्स याने डेव्हिड मलानसह इंग्लंडचा डाव सांभाळला. पहिल्या 10 षटकांत धावसंख्या 55 धावांपर्यंत पोहोचवली. यानंतर स्टोक्सने आपल्या नैसर्गिक आक्रमक शैलीने फलंदाजी सुरू केली. त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई करत तब्बल 15 चौकार आणि 9 षटकार फटकावले. त्याने मलानसोबत तिसर्‍या विकेटसाठी 199 धावांची भागीदारी केली. या सामन्यात मलान 95 चेंडूत 96 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

जेसन रॉयचा विक्रम मोडला

डेव्हिड मलान पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर बेन स्टोक्सला कर्णधार जोस बटलरची साथ लाभली आणि या दोघांनीही न्यूझीलंडच्या गोलंदाजांना पुनरागमन करण्याची एकही संधी दिली नाही. या सामन्यात स्टोक्सने 124 चेंडूंत 182 धावांची खेळी केली. यासोबतच स्टोक्सने जेसन रॉयचा 180 धावांचा विक्रमही मोडला. या सामन्यात इंग्लंडच्या संघाने 48.1 षटकांत 368 धावा केल्या. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने सर्वाधिक 5 बळी घेतले. इंग्लडने दिलेल्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव 39 षटकांमध्ये केवळ 187 धावांवरच आटोपला. चार सामन्यांच्या वन-डे मालिकेत इंग्लडने 2-1 शी आघाडी घेतली आहे.

इंग्लंडचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज

निवृत्तीनंतर नुकतेच पुनरागमन करणार्‍या स्टोक्सने बुधवारी आपल्या आक्रमक शैलीने न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर प्रहार केला. त्याने अवघ्या 76 चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. तब्बल 6 वर्षांनंतर त्याने वन-डे फॉर्मेटमध्ये शतक झळकावले आहे. द्विशतक झळकावण्यात तो हुकला असला, तरी वन-डेत इंग्लंडचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज हा विक्रम त्याच्या नावावर झाला आहे.

Back to top button