असेही रेस्टॉरंट, जिथे कर्मचारी तोंडातून ‘ब्र’ देखील काढत नाहीत! | पुढारी

असेही रेस्टॉरंट, जिथे कर्मचारी तोंडातून ‘ब्र’ देखील काढत नाहीत!

जबलपूर : भारतात खाण्यापिण्याचे हजारो शौकीन आहेत. देशभरातील विविध राज्यात विभिन्न खाद्य संस्कृतीही विकसित होत गेली आहे. याचमुळे भारताला विविधतेचा देश, असे संबोधले जाते. आताही आपण जिभेचे चोचले पुरवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या रेस्टॉरंटमध्ये जातो. तेथे आपल्या पसंतीच्या डिशेसची ऑर्डर देतो. त्यावर यथेच्छ ताव मारतो. फॅन्सी लाईट्स, मॅनेजर्स, बुलेट स्पीडने मेनू क्षणार्धात झाडून मोकळा होणारा वेटर हे एव्हाना आपल्या अंगवळणी पडलेले असते. पण, एक रेस्टॉरंट आहे, जिथे कर्मचारी साधे बोलणे सोडा, अगदी तोंडातून ब्र देखील काढत नाहीत! आणि हे रेस्टॉरंट आणखी कुठे नाही तर आपल्याच देशातील मध्य प्रदेशच्या जबपूर या ठिकाणी ग्राहकांच्या सेवेत कार्यरत आहे.

आश्चर्य म्हणजे इथे कर्मचार्‍यांचे काम केवळ इशार्‍याने चालते. बोलण्यास सक्त मनाई आहे. वेटर ऑर्डर घेण्यापूर्वी टेबलवर येऊन मेनू कार्ड ठेवतो, जी ऑर्डर दिली जाईल, ती लिहून घेतो आणि अगदी वेळेत ती सर्व्ह देखील करतो. ते ही अगदी चकार शब्द देखील न काढता.

हे रेस्टॉरंट ‘पोहा अँड शेडस्’ या नावाने ओळखले जाते. जबलपूरमधील राणीताल चौक येथे स्थित या रेस्टॉरंटमध्ये काम करणारे सर्वही 9 मूकबधिर आहेत. अगदी या रेस्टॉरंटचा मालक अक्षय सोनी याने मूकबधिरांसाठी बरेच उपक्रम राबवले असून यामुळे त्यांच्या नेमक्या वेदना काय असतात, या आपण जाणतो, असे तो आवर्जून सांगतो. त्यांची हीच आवश्यकता जाणत अक्षयने असे रेस्टॉरंट सुरू केले, जेथे कर्मचारी ग्राहकांशी अजिबात संवाद साधत नाहीत.

Back to top button