नाशिक : कुस्ती स्पर्धेचा सराव करताना जवानाचा मृत्यू, चांदवड तालुक्यात शोककळा | पुढारी

नाशिक : कुस्ती स्पर्धेचा सराव करताना जवानाचा मृत्यू, चांदवड तालुक्यात शोककळा

चांदवड (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा

नाशिकच्या चांदवड तालुक्याचे भूमिपुत्र असलेले भारतीय सैन्य दलाचे जवान विकी अरुण चव्हाण (२४) हे शुक्रवार (दि. ८) रोजी ग्रीको रोमन रेसलरचा (कुस्तीचा) सराव करीत असताना गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती रात्री उशिरा त्यांच्या घरच्यांना समजली असता कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला. या घटनेमुळे संपूर्ण चांदवड तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

चांदवड तालुक्यातील हरनुल गावचे भूमिपुत्र विकी अरुण चव्हाण (२४) हे सन २०१८ मध्ये भारतीय सैन्य दलाच्या १४ महार बटालियन दलात शिपाई पदावर भोपाळच्या सागर येथे भरती झाले होते. भरतीनंतर प्रशिक्षण घेऊन विकी जम्मू कश्मीर राज्यातील पुंछ (राजोरी) येथे कार्यरत होते. जवान विकी हा लहानपणापासून कुस्ती खेळत होता. त्यामुळे सैन्यात भरती झाल्यावर विकी ग्रीको रोमन रेसलर या कुस्तीच्या स्पर्धा खेळू लागला. पुढील महिन्यात पुणे येथे राष्ट्रीय ग्रीको रोमन रेसलर स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत यशस्वी झाल्यावर आंतरराष्ट्रीय ग्रीको रोमन रेसलर स्पर्धेसाठी विकी चव्हाण यांची निवड होणार होती. यासाठी विकी दररोज खूप मेहनत घेत सराव करीत होते. शुक्रवार (दि.८) रोजी स्पर्धेचा सराव करीत असताना विकी गंभीर जखमी झाला. त्यास दवाखान्यात उपचारासाठी नेले मात्र दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे विकीचे आंतरराष्ट्रीय ग्रीको रोमन रेसलर होण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

शहीद जवान विकी चव्हाणचे पार्थिव उद्या रविवार (दि.10) संध्याकाळी नाशिक विमानतळ (ओझर) ला पोहचेल. हरनुल येथे उद्या रात्री 9 वाजता अंत्यविधी होईल. यावेळी शासकीय इतमामात शहीद जवान विकी चव्हाण यांच्यावर अत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती चांदवडचे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button