मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये; ‘ओबीसीं’चा आंदोलनाचा पवित्रा | पुढारी

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये; 'ओबीसीं'चा आंदोलनाचा पवित्रा

नागपूर : मराठा समाजाला सरसकट जर तुम्ही कुणबी पर्यायाने ओबीसी प्रमाणपत्र देणार असल्यास पेटून उठावे लागेल, असा इशारा शुक्रवारी सर्वशाखीय कुणबी समाज, ओबीसी आंदोलन कृती समितीच्या बैठकीतून देण्यात आला. रविवारी दुपारी 3 वाजता संविधान चौकात धरणे आंदोलनाची सुरुवात होणार आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीला सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. ही पक्षाची नव्हे, आता अस्मितेची लढाई असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले. एकंदरीत मराठ्यांना सरसकट कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात विदर्भातील कुणबी, ओबीसी समाज आता रस्त्यावर उतरण्याच्या पवित्र्यात आहे. याविषयीची माहिती ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी दिली.

माजी मंत्री सुनील केदार, अनिल देशमुख, परीनय फुके, जिल्हा ग्रामीण भाजपचे अध्यक्ष माजी आमदार अशोक धवड, दीनानाथ पडोळे, सुधाकर कोहळे, शहर भाजप अध्यक्ष बंटी कुकडे, पुरुषोत्तम शहाणे, रमेश चोपडे, अवंतिका लेकुरवाळे, शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दूनेश्वर पेठे आदी अनेक नेते, पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी कबुल केले होतेे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार नाही. आम्ही आजवर मोठा भाऊ, लहान भाऊ म्हणूनच राहिलो; पण ताटातले काढाल तर अस्तित्वाची रस्त्यावर आणि न्यायालयीन लढाई लढू. मराठा समाजास स्वतंत्र आरक्षण द्या. आमचा विरोध नाही, मात्र आमचा वाटा कुणी घेणार असेल तर कुणबी पर्यायाने ओबीसी शांत बसणार नाही, असा इशारा या बैठकीत ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी दिला.

Back to top button