दुर्देवी ! खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून चिमुकल्याचा अंत, नाशिकच्या खामखेडा येथील घटना | पुढारी

दुर्देवी ! खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून चिमुकल्याचा अंत, नाशिकच्या खामखेडा येथील घटना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शेतातील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून सहा वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील खामखेडा येथे गुरुवारी (दि. ७) रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान घडली. केदा रवींद्र नामदास (६ ) असे मृत झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. यामुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. केदा हा इयत्ता पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत होता.

खामखेडा येथे गेल्या अनेक वर्षांपासून मेंढपाळ व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले नामदास कुटुंबीय खामखेडासह परिसरात मेंढीपालन करून उदरनिर्वाह करतात. गेल्या तीन महिन्यांपासून मांगबारी घाटातील नवश्या गणपती परिसरात तात्पुरत्या स्वरूपात पाल मांडून राहत होते.

गुरुवारी (दि. ७) रोजी दिवसभर पावसाची रिपरीप सुरू होती. नेहमीप्रमाणे जंगलामध्ये मेंढ्या चारून घरी परतन्यासाठी दुपारी साडे तीन वाजेच्या दरम्यान नामदास कुटुंबीय वाड्यावरील मेंढ्या आवरत असतांना रविंद्र पंडित नामदास यांचा सहा वर्षीय चिमुकला केदा रवींद्र नामदास हा बराच वेळ न दिसल्याने त्याच्या कुटुंबियांना त्याची आजूबाजुच्या परिसरात शोधाशोध केली असता तो शेजारीच शेतामध्ये असलेल्या खड्ड्याच्या पाण्यात आढळून आला.

त्यानंतर त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले परंतु उपचारापूर्वीच काळाने त्याच्यावर घाला घातला. देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरानी तपासून त्याला मृत घोषित केले. आईवडिलांसह नातेवाईकांनी मोठा हंबरडा फोडला होता. शवविच्छेदन करून रात्री उशीरा शोकाकूल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले. देवळा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  एकुलत्या एक चिमुकल्याच्या मृत्यूने खामखेडा सह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा :

Back to top button