सांगली जिल्ह्यात सर्व व्यवहार बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद | पुढारी

सांगली जिल्ह्यात सर्व व्यवहार बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

विटा (सांगली) : पुढारी वृत्तसेवा – जालना लाठीचार्जच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या सांगली जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खानापूर तालुक्यात विशेष म्हणजे विटा शहरातील औषध दुकानदारांसह भाजी मंडई, किराणा, कापड, ज्वेलरी, फेरीवाले यासह खाऊ गल्लीतील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले.

विट्यासह तालुक्यात कडकडीत बंद

जालना येथील अंतरवाली सराटी गावात शांततापूर्ण सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनात आंदोलकांवर पोलीस प्रशासनाने लाठी चार्ज केल्याच्या प्रकरणाचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटत आहेत. विट्यातही गेल्या तीन दिवसांपासून रास्ता रोको आणि बंद पाळून निषेध करण्यात आला. आज गुरुवारी जिल्हा बंदमध्येही विटा शहर आणि खानापूर तालुका सहभागी झालेला आहे. विटा आगारातील सर्व बस गाड्या काही अंशी सुरू ठेवल्या. भाजी मंडई, किराणा, कापड, ज्वेलरी, फेरीवाले यासह खाऊ गल्ली, छोटे मोठे दुकानदार, हॉटेल व्यवसायिक यांबरोबरच शहरातील मेडिकल दुकानदारांनी ही उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभाग घेतला आहे.

संबंधित बातम्या

पलुसमध्ये सर्वपक्षीयच्या वतीने सरकारचा निषेध मोर्चा

पलूस : जालना येथे मराठी समाजाच्या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी हल्ल्याचा निषेध व मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी पुकारलेल्या जिल्हा बंदला पलूस शहरासह तालुक्यात उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व व्यवहार बंद ठेवून गावागावात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकल मराठा समाजाच्यावतीने केलेल्या बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यवसायिकांनी सर्व व्यवहार दिवसभर बंद ठेवले होते. पलूस शहरातून निषेध फेरी काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याशेजारी सर्व पक्षीय यांच्यावतीने सरकारचा निषेध करण्यात आला. शहरात अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. साडेचार वाजेपर्यंत पलूस बस्थानक बंद करण्यात आले आहे. बंदमध्ये सर्व पक्ष सहभागी झाले होते. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद होते.

यावेळी नगरपरिषदेचे गटनेते सुहास पुदाले, भाजपचे रामानंद पाटील, शिव प्रतिष्ठांचे रोहित पाटील, केदार उद्योग समूहाचे अध्यक्ष सर्जेराव नलावडे, दिगंबर पाटील, शेतकरी संघटनेचे पोपट मोरे, शेतकरी कामगार पक्षाचे संग्राम थोरबोले, युवा शिवसेना जिल्हाध्यक्ष विनायक गोंदिल, संदीप सिसाळ, नगरसेवक दिलीप जाधव उपस्थित होते. तालुक्यात दुधोंडी, कुंडल, आमनापूर, बुर्ली,  सावंतपूर,रामानंदनगर,अंकलखोप, आंधळी, बांबवडे, सांडगेवाडी, वसगडे, खटाव आदी गावातून कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

विटा- मायणी

आटपाडी कडकडीत बंद

आटपाडी – आटपाडी तालुक्यात सर्व गावात मराठी क्रांती मोर्चाच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्व पक्ष आणि समाज बांधव या बंदमध्ये सहभागी झाले होते. आज तालुक्यातील सर्व गावात शाळा, अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने बंद होती.संपूर्ण तालुक्यात शुकशुकाट होता. आटपाडी येथे निषेध मोर्चा काढण्यात आला. सकाळी ११ वाजता लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ काळ्या फिती बांधून मराठा समाजातील युवक आणि ज्येष्ठांनी आटपाडी बस स्थानक ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला.

तहसील कार्यालयापुढे रस्त्यावरच बैठक मारत सभा घेण्यात आली. यावेळी मराठा समाज बांधवांनी आरक्षणाच्या धोरणाबाबत जोरदार निषेध नोंदवला. तात्काळ आरक्षण न दिल्यास आगामी निवडणुकीत जागा दाखवण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी बी. ए. पाटील, अनिता पाटील, मोहनराव देशमुख, शरद पवार, बापूसाहेब गिद्दे, शिवाजीराव पाटील, सादिक खाटीक, स्नेहजित पोतदार, डी. एम. पाटील,तानाजी नांगरे पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. आरक्षण लढ्यादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या बांधवांना आणि आरक्षण देण्यास समर्थ ठरलेल्या राज्यातील सर्व आमदार खासदारांना उपहासात्मक श्रध्दांजली वाहण्यात आली. सभेनंतर तहसीलदार श्रीमती बाई माने यांना निवेदन देण्यात आले.

मराठा समाजाच्या संयमाची परीक्षा बघू नका. नोकरी आणि शिक्षणात मराठा समाजाला ओ.बी.सी.आरक्षण दिले पाहिजे. आरक्षण जाहीर झाल्याशिवाय महाभरती करू नये. राज्यात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या समाजावर मोठा अन्याय होत आहे. हा अन्याय दूर न केल्यास मराठा समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा बापूसाहेब गिड्डे यांनी दिला.

सरकार मराठा समाजाला गुन्हेगाराची वागणूक देऊन अन्याय करत आहे. म्हणून लोकसभेतील राज्यसभेतील खासदार, विधानपरिषद आणि विधानसभेचे आमदार यांच्या निष्क्रियतेचा निषेध म्हणून आटपाडी येथे त्यांना उपहासात्मक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Back to top button