AUS vs BAN : ऑस्ट्रेलियाचा बांगलादेशवर केवळ ३८ चेंडूत विजय! | पुढारी

AUS vs BAN : ऑस्ट्रेलियाचा बांगलादेशवर केवळ ३८ चेंडूत विजय!

दुबई : पुढारी ऑनलाईन : AUS vs BAN : टी २० विश्वचषक स्पर्धेत आज ऑस्ट्रेलियाने बांगलादेशवर ८२ चेंडू आणि आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. वॉर्नर आणि फिंच या कांगारुंच्या सलामीवीरांनी अवघ्या ७ व्या षटकात सामना खिशात घातला. या विजया बरोबरच ऑस्ट्रेलियन संघाचा सेमीफायनलमध्ये पोहचण्याचा मार्ग सुकर झाला आहे. संघाच्या विजयात लेगस्पिनर अॅडम झाम्पा (५ बळी) आणि कर्णधार अॅरॉन फिंच यांनी मोठा वाटा उचलला. बांगलादेशच्या एकाही फलंदाजाला ऑस्ट्रेलियन गोलंदाजींचा सामना करता आला नाही. झम्पासह वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांनी बांगला देशच्या प्रत्येकी दोन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

ऑस्ट्रेलिया संघाने अप्रतिम कामगिरी करत बांगलादेशचा १५ षटकात अवघ्या ७३ धावांत ऑलआऊट केला. ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर अॅडम झाम्पाने या सामन्यात अप्रतिम गोलंदाजी केली. झम्पाने या सामन्यात पाच विकेट घेत बांगलादेशच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने विजयासाठीचे लक्ष्य २ गडी गमावून ६.२ षटकांत म्हणजे ३८ चेंडूत गाठले.

या विजयासह ऑस्ट्रेलियाने आपल्या गटात दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेचेही या गटात ४ सामन्यांतून ६ गुण आहेत. पण आता ऑस्ट्रेलियाचा नेट रन रेट द. आफ्रिकेपेक्षा चांगला झाला आहे. इंग्लंड ४ सामन्यांत ८ गुण मिळवून अव्वल स्थानावर पोहचला आहे.

संबंधित बातम्या

ऑस्ट्रेलियाकडून ७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार अॅरॉन फिंचने तुफानी खेळी केली. त्याने ४० धावा केल्या आणि डेव्हिड वॉर्नर (१८) सोबत ५८ धावांची भागीदारी केली. फिंचने २० चेंडूंच्या खेळीत २ चौकार आणि ४ षटकार ठोकले. वॉर्नरने १४ चेंडूत ३ चौकार लगावले. मिचेल मार्शने तस्किन अहमदच्या चेंडूवर षटकार ठोकून सामना जिंकला.

Back to top button