हिमालयाचे ‘पंधरावे शिखर’! | पुढारी

हिमालयाचे ‘पंधरावे शिखर’!

काठमांडू : ‘हिमालयाचे पंधरावे शिखर’ म्हटलं तर आज कुणालाही काही समजणार नाही. मात्र, ‘माऊंट एव्हरेस्ट’ म्हटलं तर लहान मुलांनाही समजेल! ‘माऊंट एव्हरेस्ट’ हे जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे. हिमालय पर्वतातील या शिखराची उंची 8,848.86 मीटर (29,031.69 फूट) इतकी असून ते नेपाळ व चीन (तिबेट) या देशांच्या सीमेजवळ आहे. नेपाळमध्ये याला ‘सागरमाथा’ म्हणून ओळखतात तर तिबेट मध्ये चोमो लुंग्मा म्हणतात. मात्र, एकेकाळी या शिखराला ‘पीक दत’ असेही म्हटले जात होते!

सन 1856 मध्ये ब्रिटिश राजवटीमधील भारतीय सर्वेक्षण विभागाने घेतलेल्या त्रिमितीय सर्वेक्षणामध्ये या शिखराची उंची 29,029 फूट इतकी निश्चित करण्यात आली. त्यापूर्वी हे शिखर ‘पीक दत’ या नावाने ओळखले जात होते. सर्वेक्षणानंतर राधानाथ सिकदार यांनी सिद्ध केले की हिमालयाचे हे 15 वे शिखर जगातील सर्वात उंच शिखर आहे आणि त्याची समुद्रसपाटीपासून उंची 29002 फूट इतकी आहे. या कामगिरीसाठी ब्रिटिश सरकारने राधानाथांचा गौरव केला होता.

त्या वेळचे भारतीय सर्वेक्षण खात्याचे प्रमुख (सर्व्हेयर जनरल) अँड्र्यू वॉ होते. त्यांनी आपल्या इ.स.1843 मध्ये निवृत्त झालेल्या साहेबाचे, म्हणजे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट यांचे नाव त्या शिखराला दिले. म्हणून त्या शिखराला इ.स.1865 पासून माऊंट एव्हरेस्ट म्हणू लागले. माऊंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच पर्वत असल्याने जगातील सर्वच गिर्यारोहकांचे याला सर करण्याचे स्वप्न असते. अनेक गिर्यारोहक भरमसाठ किंमत मोजून हे शिखर सर करण्याचा प्रयत्न करतात.

माऊंट एव्हरेस्ट हे अतिउंच शिखर असले तरी ‘के 2’ अथवा कांचनगंगा या इतर शिखरांच्या तुलनेत कमी अवघड आहे. इतर कोणत्याही 8,000 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या शिखरांपेक्षा एव्हरेस्टवर सर्वाधिक गिर्यारोहण चढाया झाल्या आहेत, तरीही अतिउंचीच्या त्रासामुळे खराब हवामानामुळे अनेक गिर्यारोहक मृत्युमुखी पडतात. या शिखरावर पहिली चढाई 1953 मध्ये ब्रिटिश मोहिमेतील न्यूझीलंडचे एडमंड हिलरी व नेपाळी-भारतीय शेर्पा तेनसिंग नोर्गे यांनी केली. त्यानंतर आजवर 2,436 गिर्यारोहकांकडून 3,679 चढाया झाल्या.

Back to top button