India vs Pakistan : भारत-पाकिस्तान आज हाय व्होल्टेज सामना | पुढारी

India vs Pakistan : भारत-पाकिस्तान आज हाय व्होल्टेज सामना

कँडी, वृत्तसंस्था : आशिया कपमधील सर्वात हाय व्होल्टेज भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामना आज (शनिवारी) श्रीलंकेतील कँडी येथे होणार आहे. वर्ल्डकपपूर्वी भारतासाठी चांगला सराव करून घेण्याची नामी संधी आहे. मात्र, भारतीय संघाला अजूनही दुखापतींचा फटका बसत आहे. भारताचा यष्टिरक्षक के. एल. राहुल हा दुखापतीतून अजून सावरला नसल्याने तो पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळणार नाही, त्याच्याऐवजी इशान किशन हा यष्टिरक्षण करेल.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण 132 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, ज्यापैकी भारतीय संघाने 55 जिंकले आहेत आणि 73 गमावले आहेत, तर चार सामन्यांचे निकाल लागलेच नाहीत.

भारताचा 12 सामन्यांत आठ वेळा विजय (India vs Pakistan )

संबंधित बातम्या

2019 च्या विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटचा एकदिवसीय सामना झाला होता. ज्यात भारताने 89 धावांनी विजय मिळवला. 2012 ते 2023 या कालावधीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकूण 12 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी आठ सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे. तर पाकिस्तानने चार लढती जिंकल्या आहेत. या 12 सामन्यांमध्ये सहा वेळा भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानविरुद्ध शतके ठोकली आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी प्रत्येकी दोनदा, तर महेंद्रसिंग धोनी आणि शिखर धवन यांनी प्रत्येकी एकदा अशी कामगिरी केली आहे.

एकदिवसीय आशिया चषक स्पर्धेत भारताचे पारडे जड

भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकदिवसीय आशिया कपमध्ये आतापर्यंत एकूण 13 सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत टीम इंडियाने 7, तर पाकिस्तानने 5 सामने जिंकले आहेत. आकडेवारी पाहता, टीम इंडियाचे पारडे जड राहिले आहे. मात्र, 50-50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये पाकिस्तान संघाने एकूण विक्रमात भारतावर वर्चस्व राखले आहे. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 132 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी टीम इंडियाने 55, तर पाकिस्तानने 73 सामने जिंकले आहेत.

सामन्यावर धडकणार ‘बालागोल्ला’? (India vs Pakistan)

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार्‍या सामन्यावर पावसाचे ढग दाटले आहेत. या हाय व्होल्टेज सामन्यावेळीत श्रीलंकेतील कँडीला ‘बालागोल्ला’ वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. भारत-पाकिस्तान सामन्यांची तिकिटे काही मिनिटांतच विकली जातात. हा सामनादेखील त्याला अपवाद नाही. मात्र, पावसामुळे चाहत्यांची घोर निराशा होण्याची शक्यता आहे.

या सामन्यात पावसाची शक्यता ही 91 टक्के आहे. पाऊस साधारणपणे संध्याकाळी 5.30 ला सुरू होईल. या परिसरात जवळपास 75 मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. श्रीलंकेच्या हवामान विभागाने देशाच्या अनेक भागांत काही दिवस पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. कँडी हे केंद्रीय प्रांतात येते. इथे शुक्रवारी आणि शनिवारी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने बुधवारच्या आपल्या बुलेटीनमध्ये सांगितले की, ‘पश्चिम, सबरागमुवा, केंद्रीय आणि उत्तरी प्रांतात तसेच गाले आणि मतारा जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. हा पाऊस जोरदार असण्याची शक्यता आहे. पश्चिम सबरागमुवा प्रांत आणि गाले आणि मतारा जिल्ह्यांत जवळपास 75 मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे.’

पीच रिपोर्ट : भारत-पाकिस्तान सामन्यासाठी नवी खेळपट्टी वापरली जाईल. त्यामुळे तिचे स्वरूप कसे असेल, हे आताच सांगणे कठीण आहे. बांगला देश- श्रीलंका सामन्याप्रमाणे जर खेळपट्टी असेल, तर वेगवान आणि फिरकी गोलंदाज सुखावतील, अशा परिस्थितीत फलंदाजांची चांगलीच कसोटी लागेल. येथे पावसाचा अंदाज वर्तवला असल्यामुळे त्याचाही खेळपट्टीवर परिणाम होऊ शकतो.

कशी असेल ‘प्लेईंग इलेव्हन’? (India vs Pakistan)

पाकिस्तानविरुद्ध भारताची ‘प्लेईंग-11’ कशी असले, याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. के. एल. राहुलच्या जागी इशान किशनला ‘प्लेईंग-11’ मध्ये जागा मिळेल हे जवळपास निश्चित आहे. याचबरोबर जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर हे दोघे टीम इंडियात पुनरागमन करतील. मात्र, बाबर सेनेविरुद्ध सूर्यकुमार यादव की, तिलक वर्मा दोघांपैकी कोणाला संधी मिळणार हे अजून गुलदस्त्यात आहे.

के. एल. राहुलने रोहित शर्मासमोर दोन मोठे प्रश्न उपस्थित केले आहेत. पहिला म्हणजे, रोहितला इशान किशनला खेळवावेच लागणार आहे. दुसरा म्हणजे, इशान किशन हा फक्त वरच्या फळीतच खेळू शकतो. त्यामुळे भारतीय संघ कोणाला सलामीला पाठवणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

शुभमन गिल आणि इशान किशन दोघेही सलामीवीर म्हणून चांगली कामगिरी करतात. मात्र, त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन रोहित शर्माला तिसर्‍या किंवा चौथ्या क्रमांकावर खेळवणार का, हा मोठा प्रश्न भारताचा प्रशिक्षक राहुल द्रविडसमोर असणार आहे.

भारत : 1) रोहित शर्मा (कर्णधार), 2) शुभमन गिल, 3) विराट कोहली, 4) श्रेयस अय्यर, 5) हार्दिक पंड्या, 6) इशान किशन (यष्टिरक्षक), 7) रवींद्र जडेजा, 8) कुलदीप यादव, 9) मोहम्मद सिराज, 10) मोहम्मद शमी, 11) जसप्रीत बुमराह.

पाकिस्तान : 1) फखर झमान, 2) इमाम-उल-हक, 3) बाबर आझम (कर्णधार), 4) मोह. रिझवान (यष्टिरक्षक), 5) आगा सलमान, 6) इफ्तिकार अहमद, 7) शादाब खान, 8) मोह. नवाज, 9) नसीम शाह, 10) शाहिन आफ्रिदी, 11) हॅरिस रौफ.

Back to top button