पुणे: पालिकेचे दावे ‘ई कोर्ट’वर | पुढारी

पुणे: पालिकेचे दावे ‘ई कोर्ट’वर

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  महापालिकेच्या विधी विभागांचे कामकाज अधिक सुलभ करण्यासाठी ‘ई-कोर्ट’ या मोबाईल अ‍ॅपचा वापर केला जाणार आहे. दावा दाखल करण्यापासून ते निकालापर्यंतची सर्व स्थिती या ‘अ‍ॅप ’च्या माध्यमातून वकील आणि अधिकार्‍यांना समजू शकणार आहे. महापालिकेच्या विधी विभागाचे कामकाज ‘ऑनलाईन’च्या माध्यमातून होत आहे. यात आणखी सुलभता आणण्यासाठी ‘ई-कोर्ट अ‍ॅप’ तयार केले आहे. महापालिकेने दाखल केलेले किंवा विरोधात दाखल झालेल्या सर्व दावे, खटले याची माहिती सॉफ्टवेअरमध्ये ‘अपलोड’ आहे.

या अ‍ॅपमध्ये दावा दाखल करणे, कागदपत्रे अपलोड करणे, दाव्याची सद्य:स्थिती काय ? सुनावणीच्या दिवशी काय झाले, याचा तपशील नोंदविणे, अशा विविध प्रकारच्या सुविधा आहेत. तसेच, महापालिकेशी संबंधित सर्व कायदे या अ‍ॅपमध्ये पाहता येणार आहेत. हे मोबाईल अ‍ॅप महापालिकेच्या विधी विभागाच्या पॅनेलवर असलेल्या सर्व वकील, महापालिकेचे खाते प्रमुख आणि प्रमुख अधिकारी यांना देण्यात येणार आहे. अ‍ॅपच्या माध्यमातून वकील आणि अधिकार्‍यांना पाहता येणार आहे. यामुळे अधिकार्‍यांना संबंधित खात्याने दाखल केलेल्या दाव्याची स्थिती काय आहे? हे पाहता येणार आहे. तसेच सुनावणी झाल्यानंतर संबंधित वकिलाकडून त्या दिवशी न्यायालयात झालेल्या कामकाजाची थोडक्यात माहिती अ‍ॅपमध्ये अपलोड केली जाईल.

यामुळे सुनावणीच्या वेळी काय झाले, न्यायालयाने काय आदेश दिले आहेत का ? याची माहिती अधिकार्‍यांना आणि विधी विभागाच्या प्रमुखांना सहज पाहता येणार आहे. महापालिकेला एखादा दावा दाखल करावयाचा असल्यास त्यासंदर्भातील आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी हे ’अ‍ॅप’ उपयुक्त ठरेल. अधिकारी आवश्यकतेनुसार बदल सुचवितील. तसेच कागदपत्रे अपलोड करतील. अ‍ॅपमध्ये अपलोड केलेली माहिती, कागदपत्रे ’डिलीट’ करण्याचा अधिकार हा विधी विभागाच्या प्रमुखांकडेच ठेवण्यात आला आहे.

अ‍ॅपचा वापर हा न्यायालयीन कामकाज सुलभ करण्यासाठी केला जाणार आहे. तूर्तास एक महिना प्रायोगिक तत्त्वावर त्याचा वापर करून आवश्यक सुधारणा केल्या जातील. तसेच या ‘अ‍ॅप’च्या माध्यमातून वकिलांच्या संपूर्ण कामकाजाचा लेखाजोखा समोर येईल. तसेच त्यांचे मानधन देण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.
                        – अ‍ॅड. निशा चव्हाण विधी अधिकारी, महापालिका

 

 

Back to top button