लालू प्रसाद यादव यांच्या जामिनाविरोधात CBIची सुप्रीम कोर्टात धाव, २५ ऑगस्टला सुनावणी | पुढारी

लालू प्रसाद यादव यांच्या जामिनाविरोधात CBIची सुप्रीम कोर्टात धाव, २५ ऑगस्टला सुनावणी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : चारा घोटाळा प्रकरणात राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या जामिनाविरोधात दाखल याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. झारखंड उच्च न्यायालयाने लालू यादव यांच्या जामिनाला आव्हान देणारी केंद्रीय तपास संस्था सीबीआयच्या याचिकेवरील सुनावणी २५ ऑगस्टला सुचीबद्ध करण्यास न्यायालयाने सहमती दर्शवली.

सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड, न्या. संजय करोल आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सीबीआयच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी याचिका तात्काळ सुचीबद्ध करण्याची विनंती शुक्रवारी केली होती.

झारखंड उच्च न्यायालयाने १७ एप्रिल २०२१ रोजी दुमका कोषागारातून ३.१३ कोटी रुपयांच्या अपहारासंबंधी लालू यांना जामीन दिला होता. त्यांनी अर्धा तुरूंगावास कापला असल्याचे न्यायालयाने त्यावेळी स्पष्ट केले होते. लालु यांना झारखंड मधील देवघर, दुमका आणि चाईबासा कोषागारातून फसवणूक करीत पैसे काढण्यासंबंधी चार चारा घोटाळ्यात दोषी ठरवण्यात आले होते.

२०१९ मध्ये त्यांना देवघर कोषागार प्रकरणात जामिन मिळाला होता. चाईबास कोषागार प्रकरणात ९ ऑक्टोबर २०२० मध्ये झारखंड उच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिला होता.लालू यांना चाईबासा कोषागार प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. २३ डिसेंबर २०१७ पासून ते तुरुंगात होते. यानंतर त्यांना दुमका, देवघर आणि चाईबासा कोषागार प्रकरणात जामीन मिळाला.

Back to top button